Rahul Gandhi Disqualified Uddhav Thackeray Reacts: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केला आहे. या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येत असून राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. हा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचं उद्धव यांनी म्हटलं आहे. तसेच संपूर्ण यंत्रणा दबावाखाली असल्याही उद्धव यांनी नमूद केलं आहे. उद्धव यांनी, "चोराला चोर म्हणणं आपल्या देशात गुन्हा ठरला," असा अप्रत्यक्ष टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींची खासदारी रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांसाठी प्रतिक्रिया जारी केली आहे. "चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली," अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. "ही लोकशाहीची हत्या आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 


राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनीही या प्रकरणावरुन भाष्यय करताना ही कारवाई लोकशाहीला धरुन नसल्याचं म्हटलं आहे. "राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तरीदेखील संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जो लोकशाहीला धक्का देणारा आहे," असं म्हणत अजित पवार यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "मतमतांतरे असली तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर अशाप्रकारे कोणाची खासदारकी रद्द करण्याची घटना घडलेली नाही," असेही अजित पवार यांनी म्हटलं.


कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा मुद्दा आमदार नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना या विषयावर आपलं मत मांडलं. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली. त्यांनी दिलेल्या शिकवणीत अशी भूमिका बसत नाही," असेही अजित पवार यावेळी म्हणाले. अशा घटना व सर्व प्रकार जनता बघत आहे. राज्यकर्त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन जायचे असते या देशाच्या पंरपरेला तिलांजली देण्याचे काम झाल्याचा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला. 


इंदिरा गांधींबद्दल अशाप्रकारे तत्कालीन सरकारने घेतलेली भूमिका जनतेला पटली नव्हती. इंदिरा गांधींना आणीबाणीच्या कारणाने 1977 साली पराभूत केले. त्यांनाच 1980 साली प्रचंड बहुमताने देशाच्या पंतप्रधानपदी बसवण्याचे काम देशातील जनतेने लोकशाहीच्या मार्गाने केले. त्यामुळे आताच्या काळात ज्या घटना घडत आहेत ते सर्वसामान्य जनतेला पटणाऱ्या नाहीत, असे म्हणत राहुल गांधींविरोधातील कारवाईचा अजित पवारांनी तीव्र शब्दात निषेध केला.