ओरोस : सिंधुदुर्गात आज नारायण राणे यांनी  कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आढाव्यासाठी काँग्रेस शिष्टमंडळही जिल्ह्यात येणार आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मराठवाड्यात येत असताना कोकणात वेगवान हालचाली सुरु झाल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे राहुल गांधी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असतानाच, सिंधुदुर्गात मात्र राणेंपासून काँग्रेसची जिल्हा संघटना वाचवण्यासाठी आता घडामोडी वाढल्या आहेत. आज सकाळी ११ वाजता
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे.  


ओसरगाव येथे ही तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. काँग्रेसची ही बैठक नारायण राणें यांनी आयोजित केली आहे. या बैठकीस नारायण राणे मार्गदर्शन करणार आहेत . राणे या बैठकीत याबाबत आपल्या समर्थकांशी हितगुज साधण्याची शक्यता आहे.


पक्षबदलाच्या जोरदार हालचाली सुरु असताना आयोजित या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आज काँग्रेसच्या आमदारांच एक शिष्टमंडळ जिल्ह्यात येत आहे.


राणे जर पक्ष सोडून गेले तर खबरदारी म्हणून काँग्रेसने ही पाऊले उचलल्याचे समजते. तर एकाच दिवशी राणेंची बैठक आणि काँग्रेसचे शिष्टमंडळ यामुळे या सर्व घडामोडींकडे लक्ष लागले आहे. आज नेमके काय होणार याची सर्व जिल्ह्यात उत्सुकता आहे.