COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड: जिल्ह्यात ग्रामपंचायत निडणुकीसाठी मतदान रविवारी पार पडले. या मतदानाची आज (सोमवार, २८ मे) मतममोजणी होत आहे. मात्र, या मतदानावर दुर्गम भाग असलेल्या पोलादपूर तालुक्यातील चरई ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. मतदानादिवशी ग्रामस्थांनी गावाकडे जाणाऱ्या नादुरूस्त रस्त्यासाठी श्रमदान केलं. या कामात मुंबईहून आलेले चाकरमानीदेखील सहभागी झाले होते. चरई गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे. मात्र शासन दरबारी निवदेनं देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे या प्रकाराचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत अभिनव आंदोलन केलं. यापुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय.


२ हजार १९१ उमेदवारांच्या भविष्याचा फैसला


दरम्यान, जिल्‍हयातील १४६ ग्रामपंचायतींच्‍या सरपंचपदासाठी आणि सदस्‍यपदाच्‍या ९९८ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुका पार पडलेल्या सर्व ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची आज (सोमवार, २८ मे) तालुक्‍यांच्‍या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सरपंचपदासाठी ३९१ तर, सदस्‍यपदासाठी २ हजार १९१ उमेदवार आपले भवितव्‍य आजमावत आहेत. जिल्‍हयातील १८७ ग्रामपंचायतींच्‍या निवडणूका जाहीर झाल्‍या होत्‍या. त्‍यापैकी ३९ ठिकाणी सरपंच तर, सदस्‍यपदाच्‍या ५५३ जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.


किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत


दरम्यान, दोन ग्रामपंचायतींमधील मतदारांनी या निवडणुकांवर बहिष्‍कार टाकला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन व पोलीसांनी सज्‍जता ठेवली होती . किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्‍हयातील शिवसेना , शेकाप , कॉंग्रेस राष्‍ट्रवादीसह भाजपा या प्रमुख राज‍कीय पक्षांनी या निवडणूका जिंकण्‍यासाठी कंबर कसली आहे .