अलिबाग : रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे. दहीहंडी फोडल्यानंतर खांब कोसळून एका गोविंदाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आज तीन गोविंदांचा मृत्यू झाला. खालापूर तालुक्यातील चौक नवीन वसाहत येथे ही दुर्घटना घडली. दहीहंडी बांधलेला खांब कोसळल्याने गोविंदा शुभम दत्तात्रय मुकादम हा जखमी होऊन मृत्यू पावला. तसेच दुसरा गोविंदा अजिंक्य विक्रम मोरे गंभीर जखमी झाला. त्याला एम जी एम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


थरावरून कोसळून गोविंदाचा मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहीहंडी फोडताना पाचव्या थरावरून कोसळून एका गोविंदाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. अर्जुन खोत (२५) असे मृत गोविंदाचे नाव आहे. म्हसळा तालुक्यातील खरसई गावात ही घटना घडली. तर ठाण्यातल्या दहीहंडी उत्सवात नऊ थर लावण्याच्या विक्रमाची यंदाही जय जवान पथकानं बरोबरी केली. 


ठाण्यात ११ गोविंदा जखमी


ठाणे-मुंबईतील गोंविदा पथक मानवी मनोरे उभारताना काही जण थरावरुन खाली पडल्याने ११ जण जखमी झाले आहेत. त्यात अकरा जण जायबंदी झाले असून त्यामध्ये एक तरुणीचा समावेश आहे. अकरा पैकी नऊ जण हे मुंबईतील जोगेश्वर आणि मालाड व मुलुंड येथील आहे.जायबंदी झालेले गोंविदा हे नौपाडा,विष्णूनगर येथे थर लावता जखमी झाले आहे.


मुंबईत ५१ गोविंदा जखमी


दरम्यान, दादर येथील प्रसिद्ध जिवादेवाशी निवास मंडळाची दहीहंडी साईराम मित्र मंडळाने आठ थर रचून फोडली. चेंबूर येथे विघ्नहर्ता गोविंदा पथकाने आठ थर रचून हंडी फोडली. मुंबई आणि ठाण्यात वेगवेगळया ठिकाणी हंडी फोडताना थरांवरुन कोसळून ५१ गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे.  


मुंबई-ठाण्यातल्या दहीहंडी उत्सवावर यंदा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराचे सावट पाहायला मिळाले. मोठ्या धामधुमीत होणारा हा उत्सव यंदा साधेपणाने साजरा करण्यात आला. दरम्यान, मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे. मुंबईतल्या विविध ठिकाणी ५१ गोविंदा जखमी झाले आहेत. तीन जखमी गोविंदांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.