प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : मद्यपी चालकाला बाजूला करत एसटीच्या (ST Bus) कंडक्टरनेच 60 किलोमीटर पर्यंत बस चालवल्याचा प्रकार रायगडमध्ये (Raigad News) समोर आला आहे. चालकाने मद्यपान केल्यामुळे कंडक्टरला (Conductor) बस चालवावी लागली आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळची असून श्रीवर्धन ते मुंबई प्रवासादरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चालका विरुद्ध रामवाडी येथील एस टी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे एसटी प्रवास (MSRTC) करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आबाजी धडस असे मद्यपी चालकाचे नाव असल्याचे समोर आलं आहे. एसटी प्रशासनाने या मद्यपी चालकावर निलंबनाची कारवाई केली आहे. श्रीवर्धन ते मुंबई एस बस संध्याकाळी साडेचार वाजता श्रीवर्धन स्थानकातून निघाली होती. बस माणगाव एस टी स्टँड येथे थांबली असता चालकाने तेथेच मद्यपान केले. चालकाने मद्यपान केल्याचे कंडक्टरच्या लक्षात येताच त्याने श्रीवर्धन डेपोशी संपर्क साधला. त्यानंतर कंडक्टर हा कंडक्टर कम ड्रायव्हर असल्याने मद्यपी चालकाला बाजूला केला. त्यानंतर कंडक्टरने एस टी बस ताब्यात घेतली. पुढे सुमारे 60 किलो मीटर कंडक्टरनेच एसटी बस चालवत आणली. रामवाडी येथे बस असताना चालकाविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली.


पुण्यात पीएमपी बसचे ब्रेक फेल


काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय शुक्रवारी कर्वेनगर वासियांना आलाय. प्रवासी घेऊन जात असलेल्या पीएमपी बसचे ब्रेक फेल झाले होते. उतारावर ही बस भरधाव वेगात खाली येत असतानाच चालकाने प्रसंगावधान राखत ही बस एका इमारतीच्या भिंतीला धडकवत थांबवली आहे. त्यामुळे रस्त्यावरील नागरिक आणि प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. 


साधारणपणे 25 -30 प्रवासी घेऊन पीएमपीएमएल बस एनडीएकडून महापालिकेकडे चालली होती. दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास ही बस कर्वेनगर जवळ आली. वनदेवी मंदिरापासून ही बस गांधीभवनकडे उतारावर जात होती. त्यावेळी बसमधून जोरजोरात हवा गेल्यासारखा आवाज येऊ लागला. या बसचे चालक हनुमंत मधुकर आढाळे यांना बसचे चाक पंक्चर झाल्यासारखे वाटले. त्यांनी ब्रेक मारून बस थांबविण्यासाठी प्रयत्न केला. पण, ही बस थांबत नव्हती. ब्रेक फेल झाल्याचा अंदाज चालक आढाळे यांना आला. 


चालक आढाळे यांनी प्रसंगावधान राखत उताराजवळ असलेल्या योगदा अपार्टमेंटजवळील रुपी बँकेची शाखा असलेल्या इमारतीवर ही बस चढवली. कठड्याला धडकून मोठा झटका खात ही बस जागेवर थांबली. दरम्यान, बसमधील प्रवाशांना नेमके काय घडले याचा अंदाज आलेला होता. सर्व प्रवाशांनी चालक आढाळे यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले. ब्रेक फेल झालेली ही बस जर उतारावर गेली असती तर मोठा अपघात घडून मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असती.