रायगड : शासकीय रूग्‍णालयात उपचार घेत असलेले रूग्‍ण मतदानाच्‍या हक्‍कापासून वंचित राहू नयेत, यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने शक्कल लढवली. शासकीय रूग्‍णालयातील रूग्‍णांना मतदान केंद्रांपर्यंत नेण्यासाठी खास रूग्‍णवाहिका सेवा उपलब्‍ध करून देण्‍यात आली. अनेक रुग्णांची या सुविधेचा लाभ घेतला. रायगडचे जिल्‍हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्‍वतः मतदानासाठी आलेल्‍या रूग्‍णांची आस्‍थेने चौकशी केली. मतदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल रुग्णांनीही प्रशासनाचे आभार मानले.


मतदान शांततेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. सकाळपासून मतदान शांततेत होत आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अलिबागच्या रामनाथ येथील प्राथमिक शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात सखी मतदान केंद्र असून तेथील महिला कर्मचाऱ्यानी जिल्हाधिकारी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर सेल्फी पॉइंटवर जिल्हाधिकारी यांनी फोटोही काढला. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजावावा, असे आवाहन त्यांनी केले.


रिंगणात ७८ उमेदवार


दरम्यान, मतदानासाठी काही ठिकाणी रांगा दिसल्या तर काही मतदान केंद्रांवर तुरळक मतदार होते. जिल्ह्यातील अलिबाग, पेण पनवेल, उरण, कर्जत, श्रीवर्धन आणि महाड या सात विधानसभा मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारासह ७८ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. मतदानासाठी २ हजार ७१४ मतदान केंद्र तयार करण्‍यात आली असून २२ लाख ७३ हजार २३९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काही मतदान केंद्रांवर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. तर दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.  मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.