मुंबई : रायगड - माणगाव तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तुफान कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रातांधिकारी , तहसील , भूमी अभिलेख  कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी झालं आहे. यामुळे जनसामान्यांचे हाल होत आहे. काळ नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Raigad Pen Ganpati Idols Making Factory affected from Water Logging in Heavy Rainfall )  एवढंच नव्हे तर अनेकांच्या घरात आणि गणेशमूर्ती कारखान्यात पाणी शिरलं आहे. यामुळे गणेश मूर्तिकारांना मोठा फटका देखील बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड - पेण तालुक्यातील अनेक भागात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. जोहे , हमरापूर , तांबडशेत भागात रस्त्यावर कंबरभर पाणी शिरलं आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. गणेशमूर्ती कारखान्यांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. अक्षरशः बाप्पाच्या मूर्ती भिजून कारखानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच बाळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.



जिते गावाजवळ मुंबई गोवा महामार्गावर देखील पाणी शिरलं आहे. महामार्गावरील एक लेनवरून वाहतूक सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. खरोशी गावातील अनेक घरात पाणी शिरले आहे. पेणच्या मायनी गावाजवळील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. ग्रामस्थ पाणी कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 


मुसळधार पावसात तिघेजण बुडाले 


रायगड जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसात तिघेजण बुडाले त्यापैकी दोघांचे मृतदेह हाती लागले असून एकजण बेपत्ता आहे. म्हसळा तालुक्यात मेंदडी इथं खाडीत मासेमारीसाठी गेलेली होडी उलटून 2 जण बुडाले त्यातील एकजण बचावला. तर बेपत्ता झालेल्या सर्वेश कोळी याचा शोध सुरू आहे.कर्जत तालुक्यातील पोशिर इथं नदीत पोहायला गेलेल्या देवपाडा येथील प्रमोद जोशी या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.तर पनवेल तालुक्यातील पोयंजे पाली धरणात पोहायला गेलेल्या तिघांपैकी कळंबोली येथील दीपक ठाकूर या 24 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला.