प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : कोकण रेल्‍वेच्‍या दुपदरीकरणाचे काम सध्‍या वेगात सुरू आहे. या कामासाठी मोठया प्रमाणावर बेकायदा माती उत्‍खनन होतंय. शिवाय यात वृक्षतोडही केली जातेय. मात्र, वनखाते आणि महसूल विभागाचा याकडे कानाडोळा सुरू असून शासनाला लाखो रूपयांचा चुना लावला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथं कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचं काम सुरु आहे. पहिल्या टप्प्यात रोहा ते वीर या ४६ किमीचं काम सुरु असून भराव टाकला जातोय. भराव टाकण्यासाठी खासगी वनजमिनीतून मोठ्या प्रमाणात मातीचं उत्खनन केलं जातंय. त्यासाठी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आलंय. कुठे रॉयल्टीही भरली जात नाही. 


सरकारचं लाखो रुपयांचं नुकसान करुन हे काम सुरु आहे असा आरोप होतोय. वन आणि महसूल विभागाकडे तक्रार करुनही त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचाही आरोप होतोय.  


भरावासाठी लागणाऱ्या मातीची वाहतूक करण्‍यासाठी रोह्यातील कुंडलिका नदीतच भराव करून रस्‍ता तयार करण्‍यात आलाय. मात्र ही भरावाची माती नदीच्‍या प्रवाहात वाहून गेली. जवळच्‍याच नळपाणी योजनेच्‍या जलवाहिनीत माती अडकल्‍याने जवळपास आठ गावांना पाणी पुरवणारी ही योजना बंद पडण्‍याची भीती ग्रामस्‍थ व्‍यक्‍त  करतायत. पाटबंधारे विभागाने यासंदर्भात कोकण रेल्‍वेला दंडात्‍मक कारवाईची नोटीसही बजावलीय. मात्र परिस्थिती जैसे थे.... 


'झी मीडिया'ची टीम येणार हे कळताच हे काम बंद ठेवण्‍यात आले. उत्‍खननाचे सरकारी नियम धाब्‍यावर बसवून जेसीबीच्‍या साहाय्याने माती माफियांकडून डोंगराचे लचके तोडले जातायत. त्‍यात बेकायदा वृक्षतोड बिनबोभाट सुरू आहे. महत्‍वाचे म्‍हणजे ज्‍या शेतकऱ्याच्या जागेतून उत्‍खनन केलं जातंय त्याला याची कल्पनाही नसते. काही शेतकऱ्यांना दंड भरण्याच्या नोटीसाही महसूल विभागाने पाठवल्यात. मात्र माती माफिया मोकाट आहे. महसूल आणि वनविभागाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरु असल्याचा आरोप होतोय. 
 
रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी वाळू माफियांविरोधात धडक कारवाई केली होती. आता हेच सूर्यवंशी मातीमाफियांविरोधात कारवाई करुन कोकणच्‍या निसर्गाचा विनाश थांबवतील का असा सवाल उपस्थित होतोय.