देश आणि कुटुंबासाठी काम करणाऱ्या जवानाचं कुटुंब एका रात्रीत संपलं
रात्रंदिवस देशसेवा करणाऱ्या जवानाच्या वाटेल हे डोंगरा एवढं दु:खं का?
मेघा कुचिक, झी मीडिया, महाड: रात्रंदिवस देशसेवा करणाऱ्या जवानाच्या वाटेला डोंगरा एवढं दु:ख का? असा प्रश्न एक क्षण पडतो. जवानाचं अख्खं कुटुंब एका घटनेत गेलं. 2 वर्षांचा राजा राणीचा सुखाचा संसार उद्ध्वस्त झाला. जन्मदात्यांना गमवलं. तो दिवस काळा दिवस ठरला.
महाडमधील तळीये गावावर मृत्यूचा डोंगर कोसळला आहे. पावसामुळे डोंगर खचला आणि त्याखाली अख्खी वाडीच्या वाडी गाडली गेली. त्यात एक कुटुंब भारतीय सैन्य दलातील जवानाचंही होतं. अमोल कोंढाळकर असं या जवानाचं नाव आहे. राजा राणीचा सुखाचा संसार एका दरडीनं उद्ध्वस्त केला.
हा आक्रोश अमोल कोंढाळकर यांच्या घरातला आहे. यांचं रडणं जरी ऐकू येत नसलं तरी त्यांच्या मनातील वेदना मात्र चेहऱ्यावर दिसत आहेत. भारतीय सैन्यदलात जवान असलेले अमोल हे मनालीला पोस्टिंगला असतात. त्यांचं अख्खंच्या अख्खं कुटुंबच तळीये दरड दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलं.
आई-वडील, बहिण आणि बायको असे घरातले सगळेच मातीच्या ढिगा-याखाली गाडले गेले. त्यामुळे त्यांना एवढा जबर धक्का बसलाय की, ते आता शून्यात नजर लावून बसतात. त्यांच्या तोंडातून एक शब्दही येत नाहीय. मातीच्या ढिगाऱ्याकडे ते एकटक पाहात राहतात.
अवघ्या 2 वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांची २५ वर्षांची पत्नी अश्विनी देखील त्यांच्यासोबत राहत होती. दोन महिन्यांसाठी ती गावी आली होती. डोंगर कोसळू लागल्यानंतर अश्विनीनं त्यांना ४ वाजता मेसेज पाठवला. डोंगराचा काही भाग कोसळतोय, त्यामुळे आम्ही दुसरीकडे जातो आहे. असं त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं. पण त्यानंतर ना मेसेज आला, ना फोन. आली ती थेट मृत्यूची बातमीच.
अमोल कोंढाळकर यांच्या तोंडातून एक शब्दही फुटत नाही. जमिनीकडं पाहत ते पुन्हा शून्यात हरवून जातात. त्यांचं हे मौन हंबरडा फोडून फोडून आक्रोश करतं आहे. आपल्या हक्कांच्या माणसांना ते आजही ढिगाऱ्यात शोधत आहेत.