प्रफुल्ल पवार, रायगड : भातकापणीचा हंगाम  संपला की कोकणात गावोगावच्या जत्रांना सुरूवात होते. अलिबाग तालुक्याकतील वरसोली येथील आंग्रेकालीन विठ्ठल मंदिराची जत्रा म्हणजे अलिबागकरांसाठीच पर्वणीच. पारंपरिकपणाचा बाज जपणाऱ्या या जत्रेत बदलणाऱ्या काळाचीही झलक दिसतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिबागजवळचे वरसोली गावचे आंग्रेकालीन विठ्ठ्ल मंदिर, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुतणे रघुजी आणि त्यांच्या पत्नी नर्मदाबाई आंग्रे यांनी अठराव्या शतकात या मंदिरांची बांधणी केल्याची इतिहासात नोंद आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील निर्मल एकादशीला या मंदिरात जत्रोत्सव असतो. जत्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. 


तब्बल पाच दिवस चालणारी ही जत्रा अलिबागकरांसह जिल्ह्यातील भाविकांसाठी मोठी पर्वणी असते. जत्रेच्या निमित्ताने चालणारा व्यापारउदीम हा आजही छोट्या छोट्या दुकानदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. जत्रेतील या दुकांनाचा बच्चेकंपनीसह मोठेही आनंद लुटतात. वरसोलीच्या जत्रेने जपलेली खाद्यसंस्कृती हा देखील या जत्रेतला मौजेचाच भाग असतो. 


शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापाऱ्यांनाही या जत्रेमुळे सुगीचे दिवस येत असतात. देवाच्या पूजेसाठी लागणारया फुलांपासून अगदी केरसुणीपर्यंतची विक्री इथं होत असते. दरवर्षी या जत्रेतील उलाढाल कोटींच्या घरात असते. प्रचंड गर्दी असूनही तेवढीच शिस्त‍बदध म्हणून या जत्रेकडे पाहिले जाते.