निलेश खरमरे, झी मीडिया, वेल्हा : उन्हाळी सुट्टी म्हटलं की, प्रत्येकाचा फिरण्याचा बेद असतो. गड किल्ले, निसर्ग रम्य वातावरण, थंड हवेच्या ठिकाणी आपण सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जातो. मात्र एखादा गड आकाशातून कसा दिसेल, याची फक्त कल्पनाच आपण आजवर केली असेल, मात्र 'प्रत्यक्षात याची देही याची डोळा' अनुभवता येणार आहे. ते ही स्वराज्याची पहिली राजधानी राजांचा गड रायगड येथे. अनेक घटनांचा साक्षीदार असणारा रायगड, पराक्रमी, शौर्याची गाथा सांगणारा रायगड किल्ला लाखो पर्यटकांनी पाहिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र हा राजगड हेलिकॉप्टरमधून कसा दिसेल, हे पाहाण्याची उत्कंठा सर्वांना आहे. एकदा तरी रायगड किल्ला आकाशातून पाहावा, त्याचे अफाट सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावे, असे अनेकांचे स्वप्न देखील असेल, ते स्वप्न सत्यात उतरवले आहे ते 'अमेझिंग महाराष्ट्र टुरिझम' या संस्थने. 


या अनोख्या उपक्रमाला पुरातत्व विभागाची मोठ्या प्रमाणात मदत झाली. यावेळेस पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास व्हाणे उपस्थित होते. 


महाराष्ट्रात प्रथमच गडकिल्ल्यांची सफर करण्यासाठी हवाई मार्गाचा अवलंब करण्यात आला आहे. या हवाई सफरीचा अनोखा अनुभव आणि अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार अनेक पर्यटक आहेत. विशेष म्हणजे 'राजगड' किल्ल्यावर आतापर्यंत ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.