जळगाव : या घटनेवर तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही, पण रेल्वेतून खाली पडल्यानंतर जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी तात्काळ पोहोचवण्यासाठी, रेल्वे 2 किमी मागे आली. या घटनेवर विश्वास बसण्यासाठी संपूर्ण बातमी नीट वाचा. जळगाव जिल्ह्यात ही घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परधाडे स्टेशनवरून निघालेली देवळाली भुसावळ पॅसेंजर 51181 गुरूवारी सकाळी 9.30 वाजता निघाली. या दरम्यान एक 27 वर्षाचा युवक गाडीतून अचानक खाली पडला.


या युवकाला खाली पडताना रेल्वेगाडीच्या गार्डने पाहिलं. गार्डने लगेच गाडीचे चालक दिनेशकुमार यांना मेसेजने माहिती दिली. एवढंच नाही, तर या युवकाला वाचवता येऊ शकतं, असं देखील सांगितलं. 


आतापर्यंत आपल्यापैकी अनेकांना असंच वाटतं की, रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या जीवाचं जास्त काही घेणं देणं नाही.


पण असं नसतं हे या घटनेवरून स्पष्ट झालं आहे. लोको पायलट दिनेशकुमार आणि गाडीच्या गार्डने त्या युवकाला 2 किमी पुढे आल्यानंतर वाचवण्याचा निर्णय घेतला. 


रेल्वे प्रशासनाने देखील याला होकार दिला, हा होकार देखील एखाद्याला मृत्यूच्या दारातून परत आणण्यासारखा होता. कारण यमदुतासाठी हा नकारच होता.


रेल्वे पुन्हा 2 किमी मागे घेण्यात आली, तिथं पर्यंत जिथे हा युवक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या युवकाला गाडीत नेण्यात आलं. जळगाव स्टेशनवर जीआरपीने रूग्णवाहिका तयार ठेवली होती. 


आता या युवक धोक्याच्या बाहेर आहे. या गाडीचा गार्ड, रेल्वे प्रशासन आणि चालक यांनी संयुक्तपणे या युवकाचा जीव वाचवला. राहुल पाटील या जखमी युवकावर जळगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 


एका न्यूरोसर्जनने दिलेल्या माहितीनुसार त्याला लवकरात लवकर आणण्यात आलं नसतं, तर त्याला जीव गमवावा लागला असता.