रेल्वे ई -तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
रेल्वे ई -तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा आरपीएफने पर्दाफाश
नागपूर : रेल्वे ई -तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा आरपीएफने पर्दाफाश केलाय. नागपुरातल्या मानेवाडामधल्या आर पी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर आरपीएफने धाड टाकत शत्रूघ्न सूरज सिंगला अटक केली. नागपूर आरपीएफची तिकीटांच्या काळबाजाराविरोधातली ही आतापर्यंतची सगळयात मोठी कारवाई आहे. दरम्यान, शत्रूघ्न याच्या मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावलेत.
सणासुदीचे दिवस असल्याने रेल्वेगाड्याचे आरक्षण फुल्ल आहेत. अनेक प्रवासी कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी धडपडत असतात. अशा प्रवाशांना शोधून शत्रुघ्न सूरज सिंग तिकिटांसाठी त्यांची लूबाडणूक करायचा. त्यासाठी त्याने तब्बल 212 बनावट आयडी तयार केले होते. रेड मिर्ची आणि मॅक तत्काळ अॅप या दोन सॉफ्टवेअरच्या मदतीने तो ई-तिकिटांचा काळाबाजार करायचा.
या छाप्यात सापडलेल्या 1 लाख 60 हजार 878 रुपयांच्या 65 ई-तिकिटांवरून काही दिवसांनी प्रवास होणार होता. तर बनावट आयडीच्या आधारे बनवण्यात आलेल्या 18 लाख 86 हजार 965 रुपयांच्या 860 ई-तिकिटांवर गेल्या काही महिन्यात प्रवास करण्यात आलाय. त्याचबरोबर 2016 पासून 65 लाख 59 किंमतीच्या 2825 तिकीटांची विक्री झालीय.