रेल्वे पास धारकांची दादागिरी, प्रवाशांना होतेय मारहाण
रेल्वेच्या पास बोगीतून प्रवास केल्याने अनेकांना जबरदस्तीने उतरवून शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचे प्रकार पुढे आले आहेत.
मनमाड : रेल्वेच्या पास बोगीतून प्रवास केल्याने अनेकांना जबरदस्तीने उतरवून शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचे प्रकार पुढे आले आहेत.
रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या बहुतांश गाड्यांना एमएसटी अर्थात स्वतंत्र मासिक पासधारकांची बोगी आहे. या बोगीतून शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, नाशिक-मुंबई अप डाऊन प्रवास करणारे चाकरमानी यांचा समावेश असतो.
मात्र गेल्या काही दिवसांत या बोगीतून कुणी प्रवास केला तर त्यांना बोगीतून जबरदस्तीने उतरवून शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचे प्रकार घडतायत. धक्कादायक म्हणजे सोयीनुसार बोगीचे फलक बदलण्यात येत असल्याचे समोर आलंय. अशाप्रकारे बोगीचा फलक बदलणे गुन्हा आहे.
असं असतानाही प्रवाशांची काही मासिक पासधारकांकडून अडवणूक करण्यात आली. त्याना दुस-या कोचमध्ये हुसकावण्यात आले. याला विरोध करणा-या वकीलांना गाडीतून फेकून देण्याची धमकीही देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय.
या प्रकाराची रेल्वे सुरक्षा दलाने गंभीर दखल घेतलीय. बोगीचे फलक बदलणा-या आणि मारहाण करण्याची धमकी देणा-या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मनमाड स्थानकावर घडलेल्या या प्रकारामुळे मासिक पासधारकांची दादागिरी वाढत चालल्याचं समोर आलंय. त्यामुळे या पासधारकांची मुजोरी रोखून रेल्वे प्रशासनाने वेळीच पावलं उचलून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याची गरज आहे.