अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यातील प्रवाशांना टार्गेट करुन त्यांचे दागिने चोरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला मध्य रेल्वे पोलिसांनी अटक केलीय. लांब पल्याच्या गाड्यांतील प्रवाशांना टार्गेट करणारा हा भामटा चैनीच्या वस्तू घेण्याकरता चोरी करायचा हे तपासात उघड झालंय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनवेल रेल्वे पोलिसांनी २५ वर्षीय उमेश कांबळे नावाच्या तरुणाला अटक केलीय. हा कोणी साधासुधा आरोपी नसुन हा सराईत चैन स्नॅचर आहे. कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यातील प्रवशांना हेरुन त्यांच्या अंगावरील सोनं लुटायचा आणि पसार व्हाययचा... फक्त चोरी करण्याकरता हा उमेश सिंधुदुर्गातून पनवेलला यायचा ...


बारावी पास असलेला उमेश कणकवलीचा रहिवासी आहे. त्यानं आत्तापर्यंत पाच-सहा रेल्वे प्रवाशांना लुटलंय... याकरता तो स्वत:चा जीवही धोक्यात टाकायचा... यामुळे त्याला पकडणे अवघड झालं होतं. 


कोकण कन्या, दिवा सावंतवाडी, जनशताब्दी यांसारख्या कोकणात जाणाऱ्या लांब पल्लयाच्या गाड्यातील आणि हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशी या उमेशच्या टार्गेटवर असायचे... चोरी केलेला माल हा उमेश 'आई आजारी आहे, नोकर भरती करता पैसे पाहिजेत' अशी विविध कारणे देऊन कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग भागात विकायचा... यातून मिळालेल्या पैशांतून उमेश महागडी मोटर सायकल, महागडे मोबाईल, कपडे आणि चैनीच्या वस्तू विकत घ्यायचा.


पण, प्रवाशांच्या बेसावधपणामुळेच आपली हातसफाई यशस्वी व्हायची, असा खुलासा पोलीस तपासात उमेशनं केलाय... त्यामुळे आपण कुठे जाताना विशेष करुन दागिने घातलेले असताना आजूबाजूला लक्ष ठेवूनच सावधानता बाळगणं गरजेचं आहे... कारण तुम्ही सावध राहिलात तर तुम्हीच सुरक्षित राहाल.