विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचे मोठे नुकसान
विदर्भात अचानक हवामानात बदल दिसून आला. गुरुवारी रात्री आणि आज सकाळी झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर, भंडारा, अमरावती, वर्धा या जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला.
नागपूर / भंडारा / अमरावती : विदर्भात अचानक हवामानात बदल दिसून आला. गुरुवारी रात्री आणि आज सकाळी झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर, भंडारा, अमरावती या जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका येथील शेती पिकांना बसला आहे. नागपूर शहरातही सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली असून वातावरणात गारठा वाढला आहे. पुढील 24 तासात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर भंडारा जिल्ह्यात रात्री तसेच आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली असुन जिल्ह्याच्या काही ठिकाणी अवकाली पावसासह गारपीटीने झोडपले आहे. तर अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकडाटा सह पावसाने हजेरी लावली तर काही तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
पावसाची हजेरी, फटका शेती पिकांना
नागपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका येथील शेती पिकांना बसला आहे. पावसामुळे गहू, चना, मिरची आणि भाजीपाला पिकांचे काहीअंशी नुकसान झाले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत सरासरी 10.42 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मौदा, रामटेक, सावनेर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आला. तर नागपूर शहरातही सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली असून वातावरणात गारठा वाढला आहे.
रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
भंडारा जिल्ह्यात रात्री तसेच आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्याच्या काही ठिकाणी अवकाली पावसासह गारपीटीने झोड़पले आहे. यात भाजीपाला पिकांसह रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मोहाड़ी तालुक्यातील भोसा, टाकळी , खमारी गावात अचानक वादळी वाऱ्यासह गारपीटीने झोड़पून काढले आहे. गारपीटीने परिसरातील गहु, हरभरा, मिर्ची लाखोरी, भाजीपाला पिकांसह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हरभरा, तूर खराब होणार?
अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली तर काही तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांनी काढणीसाठी कापलेल्या तूर, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हाती येणाऱ्या मालाचे नुकसान झाले आहे. शेतामध्ये उभा असलेला गहू जमीनदोस्त झाल्याने गव्हाचेही मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे तूर, हरभरा, शेतमाल खराब होण्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पाऊस , गारांचा मारा बसल्याने पिकांचे नुकसान
वर्धा जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारांचा मारा बसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, तूर या खरीप पिकांसह रब्बीतील चणा, गहू, कांदा यासह भाजीपाला यांना पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकर्यांची शेतात कापून ठेवलेल्या तुरी झाकण्यासाठी धावफळ झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गहू पिक पडले आहे. तर काही ठिकाणी कापूस ओला झाला आहे. वादळी पाऊसा मुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये कांदा, पालक, सांबार, मेथी आदी पिकांना वादळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.