Maharashtra stares at agri crisis :   मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळाची चाहूल आहे. सप्टेंबर उजाडला तरी पावसाचा टिपूसही नाही. खरिपाचा हंगाम वाया गेल्यातच जमा आहे. आभाळात ढग नाहीत, मात्र बळीराजाच्या डोळ्यात आसवांचा पाऊस जमा झालाय. हे कमी होतं म्हणून की काय? आता हा पाऊस शेतक-यांच्या मुलांच्या शिक्षणावर उठलाय. 


पावसानं पुरती ओढ दिल्यानं मराठवाड्यातले शेतकरी हतबल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भेगाळलेली ही काळी आई आणि आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी. मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता दिसत आहे. ऐन पावसाळ्यात इथली जमीन अशी पाण्याविना कोरडी झालीय. विहरींनी तर कधीच तळ गाठलाय. ऑगस्टचा संपूर्ण महिना कोरडा गेलाच. पण सप्टेंबरचा पहिला आठवडा उजाडला तरी पावसाचा थेंबही पडलेला नाही. आसवांचा पाऊस आहे तो फक्त शेतक-यांच्या डोळ्यात. यंदा पावसानं पुरती ओढ दिल्यानं मराठवाड्यातले शेतकरी हतबल झालेत. 


शेतात पीक नाही त्यामुळे घरात पैसा नाही, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा?


खरिपाचा हंगाम हातून गेल्यातच जमा आहे. कुठे पीकच उगवलं नाही तर कुठे उगवलेलं पीक करपू लागलंय. आणि याचे चटके आता शेतक-यांच्या मुलांनाही बसू लागले आहेत. डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून हा मयूर शिक्षणासाठी शहरात गेला. मात्र 3 महिन्यांपासून त्यानं क्लासची फीच भरलेली नाही. शहरात राहण्याचा खाण्या-पिण्याचा खर्च परवडत नसल्यानं मयूरनं पुन्हा गावची वाट धरलीय.  मयुर हा असा एकटाच मुलगा नाही. त्याच्यासारख्या हजारो तरूणांचं शिक्षण धोक्यात आलंय. शेतात पीक नाही त्यामुळे घरात पैसा नाही. मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा हाच प्रश्न शेतक-यांना भेडसावतोय. 


पावसानं पाठ फिरवल्यानं शेतक-यांचा तोंडचा घास हिरावला


गेल्या वर्षी अवकाळीनं शेतक-यांचा घात केला. त्यामुळे शेतक-यांची भिस्त खरीप हंगामावर होती. मात्र पावसानं पाठ फिरवल्यानं शेतक-यांचा तोंडचा घास हिरावलाय. आता सप्टेंबरमध्ये थोड्या-फार पावसाची अपेक्षा आहे. तिथंही पावसानं ओढ दिली तर मराठावाडाच नव्हे तर राज्यालाही दुष्काळाचे चटके सोसावे लागतील. 


शेतक-यांवर पीक उपटून टाकण्याची वेळ


राज्यावर दुष्काळाचं सावट असलं तरी मराठवाड्यात मात्र परिस्थिती अधिकच विदारक होत चाललीय. 40 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यामुळे बीड जिल्ह्यातली पीकं उद्ध्वस्त झाली आहेत. शेतक-यांवर पीक उपटून टाकण्याची वेळ आलीय. त्यामुळे सरकारनं मदत करण्याची मागणी मेटाकुटीला आलेल्या शेतक-यांची केलीय.