Maharashtra Unseasonal Rain : एप्रिल महिना संपला तरीही अवकाळी पाऊस राज्याचा पाठ सोडत नाही आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात हाहाकार माजवला आहे. हातातोंडाशी आलेला घास बळीराजापासून हिरावला आहे. अनेक ठिकाणी पिकांपासून शाळा, दुकानं आणि घरांची पडझड झाली आहे.  (Weather Alert in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे उन्हामुळे काही भागांमध्ये कहर केला आहे. तरदुसरीकडे अवकाळी पावसाने सर्वसामान्यांचे हाल होत आहे. राज्यात 5 मेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. (rain forecast maharashtra weather rain continues may 5 Unseasonal rain vidarbha and marathwada latest update)


कोकण आणि गोव्यात मात्र दिलासा आहे, या भागात पाऊस पडणार नाही आहे. जर पाऊस असाच पडत राहिला तर खरीप हंगामालाही धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यासह सर्वच ठिकाणी पावसामुळे तापमानात घट झालीय. उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. राज्याच्या अनेक भागात या एप्रिल महिन्यात 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवण्यात आलं होतं. मात्र पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळालाय. 



अवकाळी तडाखा 


बीड जिल्ह्याला गारपिटीची पुन्हा एकदा तडाखा बसलाय. काल संध्याकाळी आणि मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. गारपिटीसह जोरदार पाऊसही सुरू होता. वादळी वाऱ्यामुळे मोठमोठी झाडं उन्मळून पडली आहेत. शेतीपिकासह अनेक जणांच्या घरावरील पत्रेही उडून गेलेत. वडवणी भागात तर केज तालुक्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर या वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. 


पावसामुळे साथीच्या आजाराचं संकट 


वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर, मालेगाव ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.  वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अंगाची लाही-लाही करणाऱ्या उकाड्या पासून वाशिमकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. या अचानक होतं असलेल्या वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य आणि साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे. 


नांदेडला झोडपलं


पाचव्या दिवशी नांदेड मध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या पाच दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात वातावरणात बदल होऊन अधूनमधून अवकाळी पाऊस बरसतोय. गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झालीय. अचानक अवकाळी पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. 


जळगाव जिल्ह्यातही मोठं नुकसान 


जळगाव जिल्ह्यातील जामनेर, भुसावळ, मुक्ताईनगर,तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.  वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झालं आहे. सातत्याने पाऊस होत असल्याने तापमानातही मोठी घट झालीय.  या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका केळी, कांदा आणि रब्बी पिकाला बसला आहे.


एकाचा मृत्यू 


पावसाने येवला तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी देखील जोरदार हजेरी लावली... येवला तालुक्यातील अनेक गावांत विजांच्या कडकडाटसह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.. राजापूर  गावात अंगावर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला.