सोनू भिडे, नाशिक-  निसर्गाची वेगळीच किमया रविवारी नंदुरबार जिल्ह्यात पहायला मिळाली. एखादे कोल्ड्रींक स्ट्रॉने ओढावे तसा ढगातून ढगातच पावसाचा भोवरा वर खेचला गेल्याच दृश्य आकाशात बघायला मिळाल. अनेकांनी ढगफूटीची शक्यता म्हणून सुरक्षित स्थळ गाठले होते. ढगांच्या भौतिकशास्त्रातली ही पहिलीच घटना असावी, असे मत आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे प्रकार 
नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे रविवारी (७ ऑगस्ट) सायंकाळी साडे चार वाजता ढगातून ढगात म्हणजेच उलट्या दिशेने पावसाच्या सरींचा स्तंभ जात होता. शहादा शहराच्या व डोंगरगावच्या साधारणपणे तीन किलोमीटर मध्यावर, तसेच जमिनीपासून तीन किलोमीटर ते पाच किलोमीटर उंचीवर हे अद्भुत दृश्य दिसले होते. पाण्याचा स्तंभ वरच्या दिशेला सरकण्याचा प्रकार साधारण दहा ते १५ मिनिटे सुरू होता. त्यानंतर पाण्याचा स्तंभ तुटला. या घटनेनंतर शहादा येथील काही भागात जोरदार पाऊस झाला. या घटनेचे व्हिडीओ व छायाचित्रे शेतकऱ्यांनी मोबाईलमध्ये कैद केले आहेत.


वॉटरस्पाऊट म्हणजे काय?
पावसाळ्यात जलाशय परिसरात पाण्याचा उंच स्तंभ तयार होतो. भोवऱ्यासारखा हा स्तंभ वेगाने आकाशात जाऊन वाट फुटेल तसा पुढे सरकतो. काही मिनिटांत हा भोवरा विरतो. अति थंड हवा जलाशयावरुन जाताना जलाशयातले पाणी उबदार असेल तर दोघांच्या तापमानातल्या फरकामुळे ही घटना घडते. दोन ते २० मिनिटे हा निसर्गाचा चमत्कार पहायला मिळतो. २०१८ मध्ये जेजूरी येथे तर युरोप खंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे असे प्रकार अनेकदा पहायला मिळाले आहेत.


नंदूरबारमधील प्रकार वेगळा
नंदूरबारमधील प्रकार वॉटरस्पाऊटसारखाच परंतू थोडासा वेगळा मानता येईल. शेतकऱ्यांनी काढलेल्या व्हिडिओतून पाण्याचा स्तंभ ढगातच तयार झाल्याचे दिसते. म्हणजेच वॉटरस्पाऊट या नैसर्गिक घटनेतला शेवटचा टप्पा शहाद्याच्या आकाशात तयार झाला. एखादे कोल्ड्रींक स्ट्रॉने ओढावे तसा ढगातून ढगातच पावसाचा भोवरा वर खेचला जात होता. पृथ्वीचे गुरुत्वीयबल तोडून जमिनीवरील पाणी आकाशात खेचून नेण्यासाठी कमी दाबाचा भोवरा कारणीभूत ठरतो. हे जेजूरीसारख्या घटनेतून स्पष्ट झाले आहे. इतर ठिकाणीही असाच प्रकार घडलेला दिसला. परंतू शहाद्यात ढगांचे दोन थर दिसले. त्यांच्या मधोमध पाण्याचा स्तंभ दिसला. याचा अर्थ खालच्या ढगाचे पाणी वरच्या ढगांनी स्ट्रॉसारखे ओढून घेतले. या घटनेत खालच्या ढगाचे तापमान कमी असणार आणि वरच्या बाजूला जास्त तापमान म्हणजेच कमी दाब असल्याने पाण्याचे थेंब वरच्या बाजूला खेचले गेले. एकाचवेळी ही घटना घडल्याने पाण्याचा स्तंभ तयार झाले असावेत असे मत हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केले आहे.