मुंबई : मान्सूनने कोकणचा उंबरा ओलांडून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात प्रवेश केलाय... आणि याच प्रवेशाबरोबर कोकणातल्या सौंदर्याने हिरवाई आणि निळाईचा साज परिधान करायला सुरुवात केलीय. कोसळणाऱ्या पाऊसधारा, बरसणारा धबधबा आणि धुक्याची दुलई यामुळे सगळीकडेच आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय. 


मान्सूननं कोकणचा उंबरा ओलांडला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्गात मान्सून अखेर दाखल झालाय. सिंधुदर्गातल्या वेंगुर्ले, मालवण आणि देवगड या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस दाखल झाला. पहिल्या पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील बहुतांशी नदी नालेही प्रवाहीत झालेत. पावसामुळे आता शेतीच्या कमांनाही वेग येणार आहे. 


रायगड जिल्ह्यात येत्‍या ३६ तासांत जोरदार पाऊस बरसण्‍याची शक्‍यता हवामान खात्‍यानं वर्तवली आहे. यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान मान्‍सूनचं कोकणात आगमन झालं असून, रायगड जिल्‍हयातल्‍या अनेक भागांत विशेषतः महाड, पोलादपूर भागात पहिल्‍या पावसाच्‍या मध्‍यम ते हलक्‍या सरी कोसळल्‍या. तर माणगाव तालुक्‍यात पावसानं दमदार हजेरी लावली. यामुळे जनजीवन काहीसं विस्‍कळीत झालं.


तेरणा दुथडी भरून वाहू लागली 


लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यामधल्या मदनसुरी मंडळात एकाच पावसात १५४ मिलीमीटर इतका विक्रमी मान्सूनपूर्व पाऊस बरसला आहे. त्यामुळे तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली असून, लिंबाळा इथल्या तेरणा नदीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहू लागलं. लिंबाळा इथला उजवा कालवा मान्सूनपूर्व पावसानं फुटल्यामुळे, शेत जमिनीतली माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली... तर निलंगा शहरातल्या लातूर बिदर मार्गावरच्या अनेक दुकानांत पावसाचं पाणी शिरलं.


नांदेडमध्ये नदी-नाल्यांना पूर 


नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला. पैनगंगा आणि आसना नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. विदर्भ आणि मराठवाड्याला विभागणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आल्यानं, हदगाव तालुक्यात नदी शेजारच्या काही जमिनी खरडून निघाल्यात. पैनगंगेच्या पुरामुळे प्रसिध्द् सहस्त्रकुंड धबधबाही खळखळून वाहत आहे. मान्सून दाखल होण्यापूर्वीच पावसानं दमदार हजेरी लावल्यानं बळीराजा आनंदीत झालाय. १ जुनपासून आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात सरासरी ५० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झालीय.