नागपूर : सुमारे १५ दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने नागपुरात जोरदार हजेरी लावली. सोमवारी दिवसभर पावसाने उघडझाप केली. सोमवारी मध्यरात्रीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी रात्री चार तासातच तब्बल १३५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्याने मात्र नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. नागपूरच्या ओमकार नगर, दिघोरी, बेलतरोडी, हुडकेश्वर या सारख्या भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. शहरातील मध्यभागात असणाऱ्या काही शासकीय कार्यालयातही पाणी साचल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली.


बेलतरोडी भागात शेकडो घरांत पाणी शिरले. घरात ३ ते ४ फुटपर्यंत पाणी साचल्याने साहित्याची नासधूस तर झालीच मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वापरात येणाऱ्या विहिरीतही बाहेरचे सांडपाणी गेल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न नागरिकांपुढे उभा राहिला आहे.