नागपूर : गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पावसाने नागपुरात पुन्हा हजेरी लावली. नागपुरात रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या. नागपुरात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. धरणांमध्ये अत्यल्पपाणीसाठा आहे. त्यामुळे शहरातही दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान दोन दिवस बरसलेल्या पावसाने नागपूरकरांना थोडा दिलासा दिला आहे. पुढील दोन दिवसांत नागपूर भागात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागपूरकर या पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 


कोकणात मुसळधार पाऊस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईतील पनवेल, उरण, भागात रात्री मुसळधार पाऊस झाला.. या पावसामुळे गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नदी पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोळीवाडा आणि पटेल मोहल्ल्यात पुराचं पाणी शिरले. या परिसरातील नागरिकांची मराठी शाळेत राहाण्याची सोय करण्यात आली. सकाळनंतर मात्र पावसाचा जोर ओसरला. गेल्या २४ तासांत या भागात तब्बल २२२ मीमी पावसाची नोंद झाली. रत्नागिरीतील चिपळूणमधील पुराच्या पाण्याचा फटका येथील मटण व्यवसायिकांना बसला आहे. बहादूरशेख येथील एका मटण व्यावसायिकाच्या तब्बल १५ बकऱ्या पुराच्या पाण्यात गुदमरून मेल्या आहेत. दानिश शेख यांचा बहदूरशेख येथे मटण विक्रीचा गाळा आहे याच गळ्याच्या मागील बाजूस या बकऱ्या बांधलेल्या होत्या मात्र पुराचे पाणी खेर्डी आणि बहदूरशेख नाका येथे भरल्यामुळे या बकऱ्या मृत झाल्या.


 परशुराम घाटात दरड कोसळली


दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली. पूर्ण डोंगरच महामार्गावर कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच कोकण रेल्वेच्या रुळावर पाणी आल्याने कोकण रेल्वेची थांबविण्यात आली होती. घोड नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर माणगाव स्थानकातून मडगाव - दिवा पॅसेंजर रवाना करण्यात आली आहे. रायगड - पोलादपूर तालुक्यातील माटवण इथल्या मोरीवरून सावित्री नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे पंचक्रोशीतील सवाद, धारवली, कालवली, वावे, हावरे आदी गावांशी संपर्क तुटलाय.. पोलादपूरमध्ये पावसाचा जोरही वाढला होता.