नाशिक : राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जळगाव, नाशिकच्या नांदगाव शहर आणि परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. नांदगावसह परिसरात ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली तर नांदगावच्या डॉक्टरवाडी, जळगाव बुद्रुक आणि पोखारी भागात गारपीट झाल्याने गहू, हरभरासह रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर औरंगाबाद, जालना उस्मानाबादमध्येही अवकाळी पावसाने पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. काढणीला आलेला कांदा आणि शेतात काढून ठेवलेल्या कांद्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.



याआधी काही महिन्यांपू्र्वी, अवकाळी झालेल्या पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं. कापूस भिजला होता, तूर, हरभरा पिकांवरही पावसाचा परिणाम झाला होता. शेतकऱ्यांचं हाती आलेलं पीक वाया गेलं होतं. कापूस, तूर या खरीप पिकांसह रब्बीतील चणा, गहू, कांदा यासह भाजीपाला यांना पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला होता. वादळी पाऊसामुळे भाजीपाला पिकाचं नुकसान झालं. यामध्ये कांदा, पालक, मेथी आदी पिकांना वादळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. 


शेतकऱ्याला आधीच्या नुकसानीची भरपाई मिळाली नसतानाच पुन्हा आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यावर संकट कोसळलं आहे.