महाराष्ट्रात लवकरच पावसाची शक्यता, मुंबई-कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय होण्याची वाट सगळेच नागरिक बघत आहेत. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात पावसाचं पुन्हा आगमन होण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यात येत्या 4 ते 5 दिवसात पावसाची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेचे वैज्ञानिक निथा टी एस यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवसात चांगला पाऊस होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
मुंबई, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आज ऑरेंज अलर्ट तर उद्या यलो अलर्ट आहे. रायगड, रत्नागिरीत आज उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ही चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आला आहे. पण आता शहरात पाणीकपातीची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे पावसाने जर पुन्हा एकदा जोर धरला तर हा प्रश्न मिटू शकतो.
जून महिन्यात मान्सूचं आगमन झालं. पण सुरुवातीला मुसळधार पाऊस झाल्यानंतर अचानक दडी दिल्याने शेतकऱ्यांना पेरणी देखील करता आलेली नाही.