मुंबई : विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात मान्सून दाखल झाला असून अनेक भागांत पाऊस पडतोय. पण मुंबई मात्र कोरडीच आहे. मान्सून मुंबई-ठाण्यात कधी येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवणाऱ्या हवामान खात्यानं पुन्हा नवा अंदाज वर्तवला आहे. आता मुंबईत उद्या पाऊस दाखल होईल असा अंदाज वर्तवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारपर्यंत मुसळधार पावसाचा  इशारा भारतीय हवामान विभागाने दिला होता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मान्सून सुरु झाल्याची वर्दी दिल्यानंतर कोकणात पाऊसच पडलेला नाही. लातूर , अकोला याठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी सिंधुदुर्गात काही ठिकाणी तुरळक पाऊस वगळता मुंबईत ऊन पाहायला मिळत आहे. त्यामुळे हवामान विभागाचा आजचा नवा अंदाज खरा ठरो आणि उद्यापर्यंत पाऊस पडो अशी इच्छा मुंबईकर करत आहेत. 


बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पाऊस पडेल असा इशाराही देण्यात आलाय. मात्र त्यानंतर आठवडाभर पाऊस होणार नसल्याने पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करण्याचा सल्लाही हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. 



हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही ठिकाणी मध्य तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आला आहे. गुरुवारी मान्सून दक्षिण कोकण, गोव्यात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात तो पोहोचलेला नाही.