मुंबई : राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  मुंबईतही मध्यम सरी कोसळल्या. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह तुरळक सरी कोसळल्या. पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात पुढील चोवीस तासांत पावसाळी परिस्थती कायम राहणार आहे. गेल्या आठवड्यात अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला. सर्वत्र किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. आकाशही ढगाळ झाले. या काळात कोकणात काही भागांत पाऊस झाला.



तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे पावसाळी स्थिती दूर झाली नाही. आता पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात आणखी चार ते पाच दिवस पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 



रविवारी अनेक भागात सरी कोसळल्या 


पुढील २ दिवस मुंबईसह संपूर्ण कोकणात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारीही मुंबईतील बहुतांशी भागात पावसाच्या मध्यम सरी बरसल्या.   रविवारी रात्री ८.३० वाजल्यानंतर नवी मुंबई, ठाणे, मुंबई, इत्यादी ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी सुरू झाल्या.


वाढते प्रदूषण आणि त्यामुळे होणारा वातावरण बदल याचे गंभीर परिणाम गेल्या काही वर्षांत समोर येत आहेत. मुंबईसह कोकणातील वातावरणीय स्थिती गंभीर बनली असून यंदाचा मोसमी पाऊस बराच लांबला. त्यानंतर नोव्हेंबरचा पंधरवडा उलटला तरीही या भागात थंडीला सुरूवात झालेली नाही.