Raj Thackeray Press Conference: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठा आंदोलनाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे जातीचं राजकारण करत असल्याचं गंभीर आरोप केला आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरेंच्या गटाने माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला असंही राज ठाकरे म्हणाले.


माथी भडकवली जातात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल पत्रकार परिषदेत केलेल्या विधानानंतर राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध, राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज वाटेल त्या हेडिंगच्या बातम्या लागल्या. 2006 पासून आजपर्यंत आमची भूमिका एकच राहिली आहे. आरक्षण द्यायचं असेल तर ते आर्थिक निकषावर द्यावं. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. असं राज्यं भारतात कुठेही नाही. शिक्षण, उद्योग धंदे उपलब्ध असताना बाहेरच्या राज्याच्या लोकांना गोष्टी मिळतात. इथल्या मराठा मुला-मुलींसाठी वापरल्या तर आरक्षणाची गरजच नाही. एवढं असताना महाराष्ट्रात हे सारं उभं राहतं. शाहू महाराजांनी दुर्बल घटनांना या गोष्टी द्याव्यात असं सांगितलं. आर्थिक दृष्ट्या जो मागासलेला आहे त्याला आरक्षण द्यावं असं आहे. आपल्याकडे जातीचं राजकारण करुन माथी भडकवली जातात," असं राज ठाकरे म्हणाले.


थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं नाव घेत टीका


"माझ्या संपूर्ण दौऱ्यात जरांगेंचा काही संबंध नव्हता. त्यांचा विषय पण नव्हता. त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार, उद्धव ठाकरे ज्या प्रकारचं राजकारण करत आहेत हे मला मराठवाड्यामध्ये दिसत आहे. येथील काही पत्रकार यामध्ये आहेत," असं राज ठाकरे म्हणाले. तसेच पुढे बोलताना राज ठाकरेंनी पत्रकारांनाच इशारा देताना, "कोणाला एमआयडीसीत जागा, पेव्हर ब्लॉक कॉन्ट्रॅक्ट मिळालेत या साऱ्या गोष्टी माझ्या कनावर आल्यात. मी धाराशीवमध्ये होतो तेव्हा मला भेटायला आलेल्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार करत होते. मी वर या म्हटलं तर पत्रकार खाली जायला सांगत होते. आमच्या चॅनेलचे माईक हवेत असं पत्रकार म्हणत होते. आम्ही शरद पवारांच्या जवळचे आहोत ते म्हणत होते. तुतारीबरोबर त्यांचे फोटो आहेत. उद्धव ठाकरे गटाचे दोघेजण होते तिथे," असं म्हटलं.


नक्की वाचा >> राज ठाकरेंचा ताफा आडवू नका, गरज पडल्यास मुंबईत जाऊन गचांडी पकडून मराठा...: मनोज जरांगे


 "नांदेडमध्ये सर्कीट हाऊसवर दोन-चार जण ओरडत होते त्याचा शरद पवारांबरोबर आताचा फोटो आहे. काल जे झालं त्यात शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच होता. त्याला माझ्या कार्यकर्त्यांनी मार-मार मारला. नशीब पोलीस मध्ये आले. तो काय ओरडला एक मराठा लाख मराठा," म्हणजे त्यांना दाखवायंच आहे की हे जरांगे पाटलांचं आहे. सर्वांनी ही लोकं समजून घेतली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. 


राज ठाकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगरच्या सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. मात्र राज ठाकरेंना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागतोय. तसंच बीडमध्येही ठाकरे गटाने राज ठाकरेंचा ताफा अडवला होता. त्यामुळे राज या पत्रकार परिषदेत काय बोलणार याबद्दल उत्सुकता होती.