Vasant More On Lok Sabha Election:  मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरेंनी एक सूचक विधान केलं आहे. काही आठवड्यांपूर्वीच बारामती लोकसभा मतदारसंघाचा संघटक म्हणून मोरेंची निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मतदारसंघात आले होते. बारामती मतदारसंघातील चारही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या मोरेंनी खासदारकीबद्दल एक सूचक विधान केलं आहे. पक्षाने संधी दिली तर महाराष्ट्रातील मनसेचा पहिला खासदार वसंत मोरे असेल, असा विश्वास त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना बोलून दाखवला.


...तर मनसेचा पहिला खासदार मीच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यकर्त्यांची आढावा बैठक वसंत मोरेंनी घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना आमदारकीवरुन पत्रकारांनी एक प्रश्न विचारला. पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते तुमच्याकडे भावी आमदार म्हणून पाहत आहेत, असा उल्लेख करत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर वसंत मोरेंनी लगेच, "नाही, मला तर यंदा खासदार व्हायचं आहे. पुण्याचा खासदार होण्यासाठी मी इच्छुक आहे. माझ्या पक्षाने मला संधी दिल्यास या वर्षी महाराष्ट्रातील पहिला मनसे खासदार हा वसंत मोरे असेल असं मला 100 टक्के वाटतं," अशी प्रतिक्रिया नोंदवली. 


पक्ष बांधणीला प्राधान्य


संघटक म्हणून बारामतीमधील मनसेच्या पक्षबांधणीसंदर्भातही वसंत मोरेंनी माहिती दिली. "या मतदारसंघाचा संघटक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच मी येथील चारही तालुक्यांना भेट देत आहे. आज पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंडला भेट देणार आहे. चारही तालुक्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करायच्या आहेत. त्याचसाठी सध्या चाचपणी सुरु आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही बारामती मतदारसंघात जोमाने काम सुरु केलं आहे," असं वसंत मोरे म्हणाले.



राज नेमकं कोणाला आव्हान देणार?


"निवडणुकीच्या दृष्टीकोनातून काय करायचं हे राज ठाकरे ठरवतील. मात्र आम्ही लवकरात लवकर राज ठाकरेंना बारामती शहरात आणणार आहोत. या लोकसभा मतदारसंघातील पहिला मेळावा बारामती शहरात होईल," असंही वसंत मोरेंनी यावेळी स्पष्ट केलं. पवारांच्या बारामतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठा मेळावा घेणार आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे बारामती मतदारसंघात  कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शक्ती प्रदर्शन करणार आहेत. मनसे नेते वसंत मोरे यांनी ही माहिती दिली. बारामती मतदार संघात राष्ट्रवादीचा दबदबा आहे. मात्र, राष्ट्रवादी पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. यामुळे आता राज ठाकरे नेमकं कोणत्या पवारांना आव्हान देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.