धारावी प्रकल्पावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे! राज ठाकरे म्हणाले, `सेटलमेंट नीट होत नाही म्हणून..`
Raj Thackeray Questions Motive Of Uddhav Thackeray: शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली धारावी विकास प्रकल्पाविरोधात मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray Questions Motive Of Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शनिवारी धारावी विकास प्रकल्पाविरोधात निघालेल्या मोर्चावरुन विरोधी पक्षांना टोला लगावला आहे. महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने काढण्यात आलेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मोर्चाबद्दल राज यांना मुंबईमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राज यांनी मोर्चा काढणाऱ्यांच्या हेतूवरच शंका घेतली आहे.
अदानींनाच प्रोजेक्ट का?
"धारावीमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं. याबद्दल तुमचं काय मत आहे?" असा प्रश्न मनसेच्या बैठकीनंतर राज ठाकरे विचारण्यात आला. "मोठा प्रकल्प मुंबईमध्ये येतोय. हा प्रकल्प परस्पर अदानींना का दिला? अदानींकडे असं काय आहे की विमानतळ तेच हाताळू शकतात. कोळसाही तेच हाताळू शकतात. एवढा मोठा प्रकल्प आला. टाटा वगैरेसारख्या एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्याकडून टेंडर मागवायला, डिझाइन मागवायला हवं होतं. तिथे काय होणार आहे कळायला हवं होतं. पण ते झालं नाही," असं म्हणत अदानींना हा प्रकल्प देण्यासंदर्भात राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले.
कशासाठी मोर्चा काढला?
"माझं तिथल्या (धारावीमधील) पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं. अदानी समुहाच्या एका पदाधिकाऱ्यांकडे मी मला तिथलं डिझाइन दाखवा असं म्हटलं होतं. मला एवढाच प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये महाविकास आघाडीला आज का जागा आली? मला वाटतं हे जाहीर होऊन 8 ते 10 महिने झाले असतील ना? आज का मोर्चा काढला आहे? सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? कशासाठी मोर्चा काढला?" असा प्रश्न राज यांनी मोर्चा काढणाऱ्या राजकीय पक्षांना विचारला आहे.
असं थोडी असतं?
तुमचं या प्रकल्पाला समर्थन आहे की विरोध आहे? असं राज ठाकरेंना विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना राज ठाकरेंनी, "मी बीबीडी चाळीत गेलो होतो तेव्हा पण म्हणालो होतो की अशा जागी ओपन स्पेस लागते. किती शाळा होणार तिथे, किती कॉलेज होणार? रस्ते किती होणार? इमारतीत राहणारी माणसं किती? टाऊन प्लॅनिंग नावाची काहीतरी गोष्ट सांगावी लागते की नाही. एरिया घ्यायचा आणि सांगायचं की अदानींना देऊन टाकला. असं थोडी असतं?" असं म्हणत प्रकल्पाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.
सेटलमेंट करायच्या आहेत?
"8-10 महिन्यानंतर जागे झालेले कुठची आघाडी आहे त्यांनी विचारला का प्रश्न, नेमकं काय होणार आहे तिथे? की मोर्चाचा दबाव आणून केवळ सेटलमेंट करायच्या आहेत? मला वाटतं त्याच लोकांना तुम्ही विचारा," असं राज यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.