Raj Thackeray Slams BJP: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यामध्ये आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीला टोला लगावला आहे. राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावरुन परत येताना सिन्नरमधील टोलनाक्यावर अमित ठाकरेंची कार थांबवल्याने मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडल्याने भाजपाने मनसेवर निशाणा साधला होता. या टीकेचा खरपूस शब्दांमध्ये राज ठाकरेंनी समाचार आज पनवेल येथील मुंबई-गोवा महामार्गासंदर्भातील सभेमध्ये घेतला.


भाजपावर राज खवळले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान समृद्धी महामर्गावर फेन्सिंग नसलं तरी टोल मात्र लावण्यात आला आहे असा आक्षेप घेतला. रस्त्यांच्या अवस्थेबद्दल बोताना राज ठाकरेंनी भाजपाने केलेल्या टीकेचा उल्लेख करत मुलाची बाजू घेतली. राज ठाकरेंनी भाजपावर फोडाफोडीच्या राजकारणावरुन टोला लगावल्याचं पहायला मिळालं. भाजपाने संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ पोस्ट करत, "कोणा एका नेत्यासाठी किंवा त्याच्या मुलासाठी इथे वेगळे नियम पाळले जाणार नाहीत," असं म्हणत अमित ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. दादागिरी भाजपा सरकार चालू देणार नाही, असं म्हणत अमित ठाकरेंसाठी झालेल्या टोलनाका तोडफोड प्रकरणावरुन महाराष्ट्र भाजपाने केलेल्या टीकेला राज यांनी आज सभेतील भाषणामधून उत्तर दिलं.


भाजपाने नेमकं काय म्हटलेलं?


भाजपाने एक व्हिडीओ शेअर करत अमित ठाकरेंवर टोलनाक्यावरील तोडफोडीचा संदर्भ देत टीका केली होती. या व्हिडीओमध्ये संपूर्ण घटनाक्रम सांगणारा एक व्हॉइसओव्हरही वापरण्यात आलेला. अमित ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, सिन्नरमधील टोलनाका फोडतानाची दृष्यं, या टोलनाका तोडफोडीवर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, आदित्य ठाकरेंचा फोटो अशा अनेक गोष्टी या 2 मिनिटं 20 सेकंदांच्या व्हिडीओत दाखवलेले. "अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा," अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ भाजपाने शेअर केला. या व्हिडीओच्या थम्बनेलला अमित ठाकरेंचा विचार करतानाचा फोटो, बॅकग्राउण्डला टोलनाक्याची तोडफोड झाल्याचा फोटो वापरण्यात आला आहे. या फोटोवर 'फोडणं सोपं आहे हिंमत असेल तर बांधून दाखवा,' असं वाक्य लिहिलेलं होतं.



राज ठाकरे काय म्हणाले?


भाजपाने केलेल्या "अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा," या टीकेवरुन राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत टोला लगावला. "अमित कुठेतरी जात होतो तेव्हा टोलनाका फुटला. लगेच भाजपाने त्यावर टीप्पणी सुरु केली. रस्ते बांधायला पण शिका आणि टोल उभे करायला पण शिका. मला असं वाटतं भाजपाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावं," असं म्हणत राज यांनी सत्ताधारी पक्षाला सुनावलं.