पुण्यातील मुळा-मुठा नदी काटचा कायापालट करण्याची राज ठाकरेंची संकल्पना
शहरातून जाणाऱ्या मुळा-मुठा नदी काटचा कायापालट करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात नसल्याने ते काम त्यांना करवून घ्यावे लागणार आहे. त्यासाठीच त्यांनी पुण्यातील नदीसुधार प्रकल्पाचे एक दृकश्राव्य सादरीकरण तयार केले आहे. विकासात राजकारण आणू नये असं सांगत त्यांनी पुण्याच्या कारभाऱ्यांसमोर त्याचं सादरीकरण केले.
पुणे : शहरातून जाणाऱ्या मुळा-मुठा नदी काटचा कायापालट करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात नसल्याने ते काम त्यांना करवून घ्यावे लागणार आहे. त्यासाठीच त्यांनी पुण्यातील नदीसुधार प्रकल्पाचे एक दृकश्राव्य सादरीकरण तयार केले आहे. विकासात राजकारण आणू नये असं सांगत त्यांनी पुण्याच्या कारभाऱ्यांसमोर त्याचं सादरीकरण केले.
काय आहे ही संकल्पना?
- मुठा नदीच्या तीरावर मल्टिप्लेक्स स्वरूपाचं नाट्यगृह त्यात ओपन एअर थिएटरसह प्रायोगिक नाटकांसाठी स्वतंत्र मंचाची रचना
- मुठा नदीच्या किनारी वैविध्यपूर्ण अशी उद्यानं, त्यात लहान मोठयांना मनसोक्त बागडण्याची सोय
- मुठा नदीच्या पात्रात नौकाविहार, पाण्यातून सर्वदूर दळणवळणाची सुविधा
- नदीच्या दोन्ही बाजूला वाहनतळ तसेच जाहिरात फलकांची उभारणी
बालगंधर्व रंगमंदिर ते म्हात्रे पुलादरम्यानच्या नदीचा विकास करण्याची योजना त्यांच्याकडे तयार आहे. महत्वाचं म्हणजे सीएसआर म्हणजेच समाजातील धनिकांच्या सहभागातून हा प्रकल्प उभा राहणं शक्य असल्याचा दावा त्यांनी केलाय.
विकासाची कामं करताना राजकारण बाजूला ठेवण्याची अपेक्षा राज यांनी यावेळी व्यक्त केली. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक तसेच आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुण्यातून वाहणाऱ्या मुळा , मुठा नद्या ह्या नद्या राहिल्या नसून गटारे झाल्या असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यांचा कायापालट करण्याची कल्पना निश्चितच चांगली आहे. थॊडक्यात काय तर राज यांनी जे नशिकमध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जे पुण्यात करायचंय त्याची ही मांडणी आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो मतदारांच्या पचनी पडला नाही. तूर्तास राजकारण बाजूला ठेवूया. एखादी गोष्ट चांगली घडत असेल तर तिचा स्वीकार करायलाच पाहिजे. नदीसुधारच्या बाबतीत राज ठाकरेंनी मांडलेला विचार सुज्ञ पुणेकर कशाप्रकारे स्वीकारतात याकडे लक्ष लागले आहे.