मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात १८ नोव्हेंबरला सभा होणार आहे. मात्र, सभा कुठे घ्यायची यावरुन वाद निर्माण झाला होता. ज्या ठिकाणी सभा घ्यायची त्याठिकाणी पोलिसांकडून सभेला परवानगी मिळत नव्हती. आता मनसेकडून जागा निश्चित करण्यात आलेय. तेथेच सभा होणार असे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांच्या सभेसाठी जागा देण्यास ठाणे पोलिसांनी नकार दिल्याने आता ठाण्यातही रस्त्यावर सभा घेण्याचे मनसेने निश्चित केलेय. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सभा घेण्यासाठी मनसे प्रयत्नशील आहे. मात्र, या परिसरातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पण १८ तारखेला सभा घेणारच आणि ती ही ठाण्यामध्येच असा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आहे. मनसे अधिकृत या फेसबूक पेजवरून मनसेनं काहीही झालं तरी सभा घेणार असल्याचं जाहीर केले आहे.


अमित ठाकरे यांच्याकडून जागेची पाहाणी


दरम्यान, राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनीही ठाण्यात जाऊन सभा घ्यायच्या ठिकाणाची पाहणी केली. तसेच पोलिसांशीही चर्चा केली. त्यामुळे वादावर पडदा पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गडकरी रंगायतन ठाणे येथील रस्त्यावर सभा घेण्यात येणार आहे. तसे निश्चित झालेय. त्यामुळे या जागेला पोलीस विरोध करणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.



त्याआधी मनसेने ठाणे स्टेशनलगत असलेल्या अशोक टॉकीज ते ग्रंथसंग्रहालय या दरम्यानच्या रस्त्यावर किंवा चिंतामणी चौकात  सभा घेण्याचे ठरविले होते. हा परिसर परप्रांतीय फेरीवाले, रिक्षावाल्यांसह व्यापाऱ्यांचा असल्याने याच ठिकाणी सभा घेण्याचा निर्धार मनसेने केला होता. मात्र, पोलिसांनी सभेला विरोध केला. परंतु मनसे आपल्या निर्णयावर ठाम असून ठाण्यात सभा घेण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे सभा होणार हे मनसेकडून सांगण्यात येत आहे.


आम्हाला चार तासच हवेत!


राज ठाकरे यांच्या सभेमुळे अशोक टॉकीज परिसरात कोणतीही वाहतूककोंडी होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ असे सांगत आम्हाला सभेसाठी चार तास हवे आहेत, असे मनसेकडून सांगण्यात आले. या परिसरातील दुकाने सभेच्या काळात बंद असतील, तर वाहतूककोंडी मुळीच होणार नाही. सार्वजनिक वाहने ही तलावपाळीमार्गे जाऊ शकतात, असे मनसेकडून सांगण्यात आलेय.