ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर, गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागतायत. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई गुजरातला मिळवून द्यायचा डाव आहे. तसेच, केवळ मोदींच्या 'बुलेट ट्रेन' हट्टासाठी महाराष्ट्र आणि देश कर्जबाजारी होत आहे. असा थेट हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.


लक्षभेदाबाबत उत्सुकता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे येतील जाहीर मेळाव्यात ते बोलत शनिवारी बोलत होते. हा मेळावा जाहीर झालेपासून जागेच्या वादामुळे हा मेळावा चर्चेत होता. मात्र, 'लक्ष्यभेदी मेळावा' या शिर्षकामुळेही मेळाव्याबद्दल उत्सुकता होती. त्यामुळे राज ठाकरे आपल्या भाषणातून कोणाचा लक्ष्यभेद करणार याकडे मनसे कार्यकर्ता आणि राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. दरम्यान, आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी विविध मुद्दयांवर भाष्य केले.


मुंबईच्या पदपथावर बसण्याचा पहिला अधिकार मराठी तरूणांना


आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी फेरीवाला आंदोलनावरून थेट भूमिका मांडली. मुंबईवर मराठी माणसाचा हक्क आहे. त्यामुळे मराठी तरूणांनाच रस्त्यावर फेरीवाला म्हणून बसण्याचा अधिकार आहे. पण, आर्थिक संबंधातून मनसे सोडून इतर राजकीय पक्ष फेरिवाल्यांची बाजू घेत आहेत. त्यातून मनसेला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. पण, हे शक्य होणार नाही. मुंबईचे रस्ते फेरिवालामुक्त केल्यामुळे शहरातील मराठी माणसाला आनंद होत आहे. नागरिक मनसेच्या पाठिमागे आहेत. पण, सरकारला ही बाब आवडली नाही. त्यातूनच मनसे कार्यकर्त्यांवर अंदोलनासोबतच दरोड्याच्या केसेस टाकल्या जात आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.


भाजप सत्तेचा अमरपट्टा घेऊन आले नाही


मराठी माणसाच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकत्यांवर दरोड्याच्या केसेस टाकल्या जात आहेत. पण, आज  सत्तेवर असलेला भाजपही सत्तेचा अमरपट्टा घालून आले ऩाही. आमचे सरकार आल्यावर आम्हीही दरोड्याच्या केसेस टाकू, असा  इशारा राज ठाकरे यांनी या वेळी दिला. सोबतच, भाजपला आंदोलन करत नाही. त्यांची आवस्था 'ना घर का ना घाट का' अशी 
झाली आहे. त्यांना निवडणूक लढवायला उमेदवारही मिळत नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.


'ब्लू फिल्म' दाखवून गुजरात निवडणूकीत प्रचार


2014मध्ये मनसेने महाराष्ट्राची 'ब्लू प्रिंट' दाखवून निवडणूक लढवली. मात्र, त्यावेळी सत्तेत आलेला भाजप आज गुजरातमध्ये 'ब्लू फिल्म' दाखवून निवडणूक लढवत आहे. हार्दिक पटेलच्या अश्लिल सीडीवरून टीका केली जात आहे. हा निवडणूक प्रचाराच मुद्दा नाही. तर, तो केवळ अंबटशौखीनपणा आहे, असे ठाकरे म्हणाले.


'पप्पू'समोर टाकली नांगी


आजवर राहूल गांधींना पप्पू म्हणून हिनवले. पण, याच पप्पूने गुजरातमध्ये भाजपला फेस आणला आहे. पप्पूला घाबरून भाजपने अवघं मंत्रीमंडळ कामाला लावले आहे, अशा शब्दातही ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.


वेळीच सावध व्हा, महाराष्ट्राला पडतोय परप्रांतीयांचा विळखा


आजवरची सर्व युद्ध ही जमीनीसाठीच झाली आहेत. म्हणूनच भुगोलाशिवाय इतिहास नसतो हे ध्यानात घ्या. मुंबईतील मराठी माणसाला बेघर केले जात आहे. त्यासाठी शाकाहार, मांसाहार हा वाद लावला जातोय. घरांच्या किमती वाढवून सांगितल्या जात आहे. इतकेच नव्हे तर, आता तर 'बुलेट ट्रेनचा' पर्याय वापरला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेच, मुंबई, ठाण्यात परप्रांतीयांचा विळखा पडत आहे. यांच्यावर कारवाई होत नाही. छटपूजेच्या माध्यमातून मराठी माणसाला ताकद दाखवली जात आहे. हा धोका वेळीच ओळखला पाहिजे. गुजरातला मुंबई हवी आहे. तर, इतर परप्रांतीयांना मराठी मुलांचा रोजगार हिसकावून घ्यायचा आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा, असा इशाराही राज ठाकरेंनी या वेळी दिला.


'समृद्धी'च्या नावाखाली वेडंवाकडं खपवून घेणार नाही


सध्या राज्यात 'समृद्धी' महामार्गाचा मुद्दा गाजतोय. पण, राज्याच्या विकासासाठी समृद्धी मार्ग असेल तर, त्याला माझा विरोध नाही. पण, समृद्धीच्या माध्यमातून जर विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करणार असेल तर, ते मी खपवून घेणार नाही. मराठी मनं तुटू देणार नाही. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मतोश्री जिजाऊंचे माहेर विदर्भात (बुलढाणा) आहे. हा ऐतिहासिक वारसा आम्ही तूटू देणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांन सरकारला या वेळी दिला.


देवेंद्र फडणविसांकडे हिंमत आहे काय?


देशातील जवळपास सर्वच राज्ये आपापल्या भाषेद्धल अभिमान बाळगून आहेत. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटकमध्येही हीच स्थिती आहे. कर्नाटकात जर स्थानिक असलेली कन्नड भाषा येत नसेल तर, चालते व्हा, असे सांगितले गेले. अशी हिम्मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे काय? असा सवाल राज ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केला.


मलाच प्रश्न का?


टोलच्या मुद्द्यावरून नेहमी मनसेला लक्ष केले जाते. पण, मनसेच्या आंदोलनानंतर किती टोल बंद झाले हे पाहिले का? असा सवाल विचारतानाच. आम्ही टोल बंद करू असे भाजप सांगत होते. मात्र, सत्तेवर आल्यावर ते का गप्प बसलेत हे कोणी विचारत नाही, असेही ठाकरे या वेळी म्हणाले.