राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांच्या वाढदिवसानिमित्ताने औरंगजेबाचं प्रिंट असलेला केक; व्हिडीओ व्हायरल
मनसे नेते अविनाश जाधवांनी कापला औरंगजेबाचा केक. शर्मिला ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त केक कापल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Kolhapur Violence : मनसे नेते अविनाश जाधव ( MNS leader Avinash Jadhav ) यांनी औरंगजेबाचं प्रिंट असलेला केक कापल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ येथे शर्मिला ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त अविनाश जाधवांनी औरंगजेबाचं प्रिंट असलेला केक आणला होता. मात्र, शर्मिला ठाकरे हा केक कापताना दिसत नाहीत. अविनाश जाधव केक कापताना व्हिडीओ दिसत आहेत.
मुंबईत मनसेचे आंदोलन
अहमदनगरच्या भिंगारमध्ये काही तरुणांनी औरंगजेबाचे फोटो नाचवल्यानं वाद झाला होता. आता कोल्हापुरातही असाच प्रकार घडला होता. याचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत. बुधवारी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचा पुतळा जाळला. यावेळी औरंगजेबविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. औरंग्याचं उदात्तीकरण खपवून घेतलं जाणार नसल्याचा
इशारा मनसेकडून देण्यात आला होता.
काय घडलं होत नेमकं?
शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं ही वादाची ठिणगी पेटली. त्यावरून आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापुरातील दसरा चौक, टाऊन हॉटल, लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेक केली. शिवाय आक्रमक हिंदुत्ववादी संघटनांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलनही केलं. या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता.
400 जणांवर गुन्हे दाखल, 36 जणांना अटक
बुधवारी झालेल्या दगडफेक आणि तोडफोड प्रकरणी आतापर्यंत 36 जणांना अटक करण्यात आलीय. त्यातील 3 जण अल्पवयीन आहेत. तर एकूण 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणारे हे कॉलेज विद्यार्थी असल्याचं तपासात निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेतलं असून, आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांना कुठून मिळाला? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. कोल्हापुरात सध्या शांतता असून, पुन्हा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यास कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.तसंच कोल्हापुरातील इंटरनेटसेवा रात्री 12 पर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली
वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणा-यांवर कठोर कारवाईचा इशारा
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास गुन्हे दाखल होणार आहेत. महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस अलर्ट झाले असून वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणा-यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जातीय तेढ निर्माण होईल अशी पोस्टर्स आणि लिखाण करु नयेत अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराच नाशिक पोलिसांनी दिला आहे.