रत्नागिरी : राजापूर येथील गंगातीर्थचा विकास सध्या थांबला आहे. हजारो  भाविक या ठिकाणी येतात. पण त्याठिकाणी कोणतीही सोय नाही. पडलेल्या भिंती, कुंडाची झालेली वाईट अवस्था आणि उडालेले पत्रे. गंगा आली की देशभरातून हजारो भक्त येतात. पण सोयी-सुविधा मात्र काही नाही. आणि याला कारणीभूत आहे वाद. राजापुरातील उन्हाळे येथे असलेल्या गंगा तीर्थाचा विकास आता गंगापूत्र आणि ग्रामपंचायत यांच्या वादात रखडला आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कुडांची अवस्था, आणि इमारतीची अवस्था दयनीय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंगापूत्र आणि ग्रामपंचायतच्या वादात २०१७मध्ये मिळालेला ९८ लाखांचा निधी देखील मागे गेला. त्यामुळे गंगा तीर्थक्षेत्राच्या विकासावर त्याचा परिणाम जाणवत आहे. उन्हाळे येथे गरम पाण्याचे कुंड आणि गंगातीर्थ असल्यानं वर्षभर भाविक या स्थानाला भेट देतात. 


स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये देखील त्याबाबत उदासिनता दिसून येते. या साऱ्या प्रकरणात आता समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे यातून मार्ग निघणं आणि गंगातीर्थ क्षेत्राचा विकास होणं गरजेचं आहे.


गंगातीर्थाला ऐतिहासिक महत्व आहे. शिलाहार राजाच्या काळात गंगेचा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महराजांनी देखील या तीर्थक्षेत्राला भेट दिल्याचा इतिहास आहे. पण, अशा या गंगेचा विकास सध्या रखडला आहे. निसर्ग संपन्न अशा कोकणात पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. पर्यटनावर भर देताना अशा क्षेत्रांचा विकास कधी आणि कसा होणार हा महत्त्वाचा मुदा आहे.