Rajaram Sakhar Karkhana: महाडिकांचा सतेज पाटलांना व्हाईटवॉश, म्हणतात `कंडका कुणाचा पडला?`
kolhapur News: कारखान्याच्या निवडणुकीत कंडका कुणाचा पडला हे दाखवा. सगळे कंडके पडले त्या लाकडात आता काय राहिलं नाही, असं म्हणत महादेवराव महाडिक (Mahadevarao Mahadik) यांनी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या जखमेवर मीठ चोळलं.
Rajaram Sakhar Karkhana Election: राजाराम सहकारी साखर कारखान्यावर महाडिक गटानं निर्विवाद एकहाती सत्ता मिळवली आहे. विरोधी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या पॅनेलचा धुव्वा उडालाय. 21 पैकी 21 जागा महाडिक पॅनेलनं जिंकल्या आहेत. महादेवराव महाडिक(Mahadevarao Mahadik) यांनी साखर कारखाना निवडणुकीत सतेज पाटलांना धोबीपछाड दिलाय. सुरुवातीपासून ते अंतिम मतमोजणी पर्यंत महाडिक पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. राजाराम कारखान्यावर गेल्या 28 वर्षांपासून महादेवराव महाडिक गटाची सत्ता आहे. ही सत्ता अबाधित राखण्यात महाडिक गटाला यश मिळालंय.
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. महादेवराव महाडिक यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानं निवडणुकीत काय निकाल लागणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर आता महाडिकांचा सतेज पाटलांना वाईटवॉश दिल्याचं पहायला मिळतंय.
राजाराम साखर कारखान्यासाठी 91 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली होती. विजयानंतर महादेवराव महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी सतेज पाटलांना टोले लगावण्याची संधी सोडली नाही. कारखान्याच्या निवडणुकीत कंडका कुणाचा पडला हे दाखवा. सगळे कंडके पडले त्या लाकडात आता काय राहिलं नाही, असं म्हणत महादेवराव महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्या जखमेवर मीठ चोळलं.
आणखी वाचा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन नॉट रिचेबल? अजित पवारांनी असे उत्तर दिले की...
दरम्यान, राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांना विजयी गुलाल लागला आहे. राजाराम साखर कारखाना परिसरात महाडिक समर्थकांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला आहे.