औरंगाबाद: राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून नेते आणि कार्यकर्ते बाहेर पडण्याचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. आता यामध्ये राजेंद्र दर्डा यांची भर पडली आहे. राजेंद्र दर्डा यांनी काँग्रेसच्या प्रसारमाध्यम आणि संपर्क समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे समजते. औरंगाबादसह मराठवाड्यातील त्यांचा जनसंपर्क पाहता काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी राजेंद्र दर्डा हे औरंगाबदमध्ये सलग १५ वर्षे काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदही भुषविले होते. काँग्रेसच्या वर्तुळातही दर्डा घराण्याचा चांगलाच दबदबा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राजेंद्र दर्डा राजकारणापासून दूर होते. मात्र, तरीही काँग्रेसच्या प्रसारमाध्यम आणि संपर्क समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते. 


परंतु, दर्डा आता यांनी या पदाचाही त्याग केला आहे. त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र सुपूर्द केले. राजेंद्र दर्डा यांनी वैयक्तिक कारणामुळे समितीचे अध्यक्षपद सोडत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता राजेंद्र दर्डा काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच त्यांची आगामी वाटचाल काय, असेल याविषयीची उत्सुकताही वाढली आहे.