बंधाऱ्यात भाजप शहराध्यक्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ
भिमानदीच्या केदारेश्वर बंधाऱ्यात आढळला मृतदेह
हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : राजगुरुनगर शहरालगत असणाऱ्या भिमानदीच्या केदारेश्वर बंधाऱ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तरुणाच्या पाठीवर असलेल्या बॅगमध्ये दगड आढळून आल्याने आत्महत्या की हत्या यामध्ये संभ्रम तयार झाला आहे. राजगुरूनगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. रुपेश विष्णुपंत बोऱ्हाडे असं या तरुणाचे नाव असून रुपेश हा राजगुरुनगर भाजप शहर अध्यक्ष विष्णुपंत बोऱ्हाडे यांचा मुलगा आहे.
भिमानदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यावरुन राजगुरुनगर शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. सध्या हा बंधारा पाण्याने तुटुंब भरलेला असून आज सकाळच्या सुमारास काही नागरिक केदारेश्वर बंधाऱ्यावरुन जात असताना तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना आढळून आला.
स्थानिक नागरिक, राजगुरुनगर नगरपरिषद आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. रुपेशच्या पाठीवर बॅग अडकवलेली होती. त्या बॅगेमध्ये दगड होता. मृतदेह पाण्यावर येऊ नये म्हणून हा दगड टाकण्याचा आल्याचा संशय आहे. त्यामुळे रुपेशने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.