मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावटपासाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना अल्टिमेटम दिला आहे. लोकसभेच्या हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या तीन जागांसाठी स्वाभिमानी पक्ष आग्रही आहे. आघाडीच्या नेत्यांनी दोन दिवसांत याबाबत निर्णय न कळवल्यास स्वाभिमानी १५ जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवेल, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अगोदरच भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला महाआघाडीत सामील होण्याविषयी झुलवत ठेवले आहे. त्यांची महाआघाडीत येण्याची शक्यता कमीच दिसत आहे. अशात राजू शेट्टी यांनीही वेगळा मार्ग निवडल्यास महाआघाडीचे स्वप्न भंग पावेल. मात्र, स्वत: काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच महाआघाडीविषयी पुरते गंभीर नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयनराजेंच्या डोक्यावर राष्ट्रवादीच्या 'अक्षता'; शरद पवारांकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब


सुरुवातीला आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करताना स्वाभिमानीने चार जागांची मागणी केली होती. मात्र, नंतरच्या काळात एक जागा कमी करत स्वाभिमानीने हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या जागांवरून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. यापैकी हातकणंगलेच्या जागेसाठी आघाडीच्या नेत्यांनी तात्काळ हिरवा कंदील दाखवला. उर्वरित दोन जागांविषयी आघाडीच्या नेत्यांनी अजूनही आपला निर्णय स्वाभिमानीला कळवलेला नाही. मात्र, आता बराच काल उलटल्यामुळे राजू शेट्टींनी आघाडीच्या नेत्यांना अखेरची मुदत दिली आहे. 


मुंबईत सोमवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची जागावाटपाबाबत अंतिम बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.