उदयनराजेंच्या डोक्यावर राष्ट्रवादीच्या 'अक्षता'; शरद पवारांकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब

महिन्याभरात माझं लग्न आहे. तेव्हा अक्षता टाका, संपल्या म्हणू नका,

Updated: Mar 9, 2019, 01:46 PM IST
उदयनराजेंच्या डोक्यावर राष्ट्रवादीच्या 'अक्षता'; शरद पवारांकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब title=

सातारा: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा मतदारसंघातून अखेर उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीत शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर स्थानिक नेत्यांमधील सर्व वाद संपुष्टात आले आहेत. त्यामुळे आता साताऱ्यातून निवडणूक लढवण्याचा उदयनराजे भोसले यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

स्थानिक नेत्यांशी फटकून वागत असल्यामुळे उदयनराजे यांना साताऱ्यातून पुन्हा उमेदवारी देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचा जोरदार विरोध होता. त्यामुळे उदयनराजे विरोधी गटाने सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि रामराजे निंबाळकर यांचे नाव उमेदवारीसाठी उचलून धरले होते. यानंतर उदयनराजे भोसले यांनीही दगाफटका झाल्यास बघून घेईन, असा इशारा दिला होता. 

महिन्याभरात लग्न आहे, अक्षता टाका, संपल्या म्हणू नका; उदयनराजेंचे सूचक वक्तव्य

मध्यंतरीच्या काळात उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक वाढली होती. त्यामुळे उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. पाटण येथील कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सूचक विधानही केले होते. महिन्याभरात माझं लग्न आहे. काही महिन्यांनी सगळ्यांचंच लग्न आहे. तेव्हा अक्षता टाका, संपल्या म्हणू नका, असे म्हटले होते. त्यामुळे शरद पवार उदयनराजेंबाबत काय निर्णय घेणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर शरद पवार यांनी उदयनराजेंच्या पारड्यात दान टाकत त्यांना पुन्हा एकदा साताऱ्याची सुभेदारी बहाल केली आहे.