शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रावादीची `ही` ऑफर
भाजपशी फारक घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून ऑफर देण्यात आली आहे.
मुंबई : भाजपशी फारक घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना आमदारकीचा हा प्रस्ताव दिला आहे. याला शेट्टी यांच्याकडून प्रतिसाद मिळाला आहे. दोन दिवसात राजू शेट्टी या प्रस्तावावर विचार करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोकण दौऱ्यानंतर राजू शेट्टी यांच्या आमदारकीबाबतअंतिम निर्णय होणार आहे.
राष्ट्रवादी या प्रस्तावामुळे राजू शेट्टी हे विधान परिषदेत निवडून जाण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी तसा प्रस्ताव दिला आहे. मागील लोकसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टी यांनी भाजप आणि मित्र पक्षांच्या सहकार्याने निवडणूक लढवली होती. पण तीन वर्षानंतर त्यांचे भाजपशी संबंध बिघडले. त्यांनी मोदी-भाजपवर जोरदार टीका सुरु केली. तेव्हापासून ते काहीसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे झुकले होते.
लोकसभा निवडणूक त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अपयश आले. लोकसभा- विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधान परिषदेतील एखादी जागा मिळावी, असा आग्रह महाविकास आघाडीकडे धरला होता.
दरम्यान, आता राज्यपाल कोट्यातून काही जागा भरल्या जाणार असून यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची त्यांच्या शिरोळ तालुक्यातील निवासस्थानी भेट घेतली. शेट्टी आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर ते भाजपकडे झुकले होते. भाजपने त्यांना विधान परिषदेमध्ये संधी दिली होती. मात्र तेव्हा त्यांना अपक्ष म्हणून उमेदवारी न देता भाजपचा उमेदवार म्हणून अर्ज भरायला लावला होता. यामुळे तांत्रिक दृष्ट्या सभागृहांमध्ये खोत हे भाजपचे आमदार म्हणूनच होते. त्यानंतर ते नाराज होते.