कोल्हापूर: ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने लवकरात लवकर कर्जमाफीच्या निर्णयात बदल केला नाही तर त्यांना रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. ते बुधवारी कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राजू शेट्टी यांनी म्हटले की, सरकारला कर्जमाफीच्या धोरणात बदल करावा लागेल. अन्यथा त्यांना रोषाचा सामना करावा लागेल. मुळात सरकारने व्यापक चर्चा करून कर्जमाफी जाहीर केली असती तर बरे झाले असते. मात्र, आता यानंतरही सरकार ऐकणार नसेल तर आम्हाला वेगळ्या भाषेत सांगावे लागेल, असा सूचक इशारा राजू शेट्टी यांनी दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'केंद्र सरकारच्या भरवशावर शेतकरी मदतीचं आश्वासन दिलं का?' फडणवीसांचा सवाल


नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानुसार सप्टेंबर २०१९पर्यंत दोन लाखांपर्यंतची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. या योजनेला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आले आहे. मार्च २०२०पासून ही योजना लागू होईल.


मात्र, भाजपने या निर्णयावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार होते. पण त्यांनी शब्द फिरवला. केवळ दोन लाखांची कर्जमाफी देऊन या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. या सरकारने शेतकऱ्यांना एक नवा पैसाही दिला नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. 



ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला - फडणवीस