`चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांच्या घरी नेऊन घाला`
यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावणं अपेक्षित होत पण
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांची एक व्हिडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल होतेय. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून वादग्रस्त विधान केलंय. खरंतरं चारा छावणी आणि रोजगार हमी यासाठी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याकडे अर्ज करण्यात येत होता. यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावणं अपेक्षित होत पण राम यांनी यासंदर्भात भलतंच वक्तव्य केलंय.
वादग्रस्त विधान
जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी शेतकर्यांना चारा छावण्यांबाबत अजब सल्ला दिलाय. चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांच्या घरी नेऊन घाला असा सल्ला राम शिंदे यांनी दिलाय.
पाथर्डी पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गावांसाठी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या छावण्या व रोजगार हमीचे कामे सुरु करण्यात याव्यात यामागणीसाठी नगरसेवक रमेश गोरे यांनी राम शिंदे यांना निवेदन दिले.
त्यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनी 'तुमची जनावरे पाहुण्याकडे नेऊन घाला' असे सांगताच उपस्थितामध्ये मोठा हशा पिकला.
क्लिप व्हायरल
अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती आहे पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावं लागत आहे. राम शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप आता व्हायरल झाली असून त्याविषयी संताप व्यक्त होऊ लागली आहे.