Nashik Tapovan Ram Srushti :  नाशिक शहरामध्ये तब्बल 71 फूट उंच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या संकल्पनेतून ही भव्यदिव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागानं 5 कोटींचा निधी मंजूर करुन दिला. नाशिक महापालिकेनं जवाहरलाल नेहरु पुनरुत्थान योजनेतंर्गत तपोवनामध्ये 5 एकर जागेत रामसृष्टी उद्यान निर्माण केलं आहे. तिथे रामसृष्टीमध्ये श्रीराम यांचं हे देखणं शिल्प उभारण्यात आलं आहे. राम-सीता-लक्ष्मण यांचा पदस्पर्श नाशिकच्या भूमीला लाभला आहे. त्यामुळे देश-विदेशातून असंख्य भाविक या ठिकाणी येत असतात. त्यात ही मूर्ती पर्यटकांसाठी आकर्षणाचं नवं केंद्र बिंदू ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभू श्रीराम चंद्राच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीस धार्मिकदृष्ट्या महत्व आहे.मोठ्या संख्येने देश विदेशातील भक्त - भाविक व पर्यटक येतात. तपोवनातं  गोदा-कपिला संगम, श्रीराम-सीता मातेची झोपडी, शूर्पनखेचे नाक कापल्याच्या अख्यायिकेचे स्थळ, राम-लक्ष्मण मंदिर अशी कितीतरी शक्तीस्थळे भाविकांप्रमाणेच पर्यटकांना खेचून आणतात.  राज्य शासनाच्या मदतीने रामसृष्टी उद्यान व तपोवन पर्यटन हब व्हावे यासाठी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अँड राहुल ढिकले यांनी राज्य शासनाच्या पर्यटन  मंत्रालयाकडून माध्यमातून पाच कोटींचा निधी मंजूर करत रामसृष्टीत 71  फुटी प्रभू श्रीराम शिल्प उभारले आहे.


दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. दरवर्षी हजारो भाविक रामतीर्थात स्नान, पुजाविधी साठी येतात.शहराच्या सौंदर्यात भर पडावी ,पर्यटनाला गती मिळावी याकरिता नाशिक महापालिकेने जवाहरलाल नेहरु पुनर्उत्थान योजनेतंर्गत तपोवनात पाच एकर जागेत रामसृष्टी उद्यान उभारले. देशभरातूनच नव्हे,जगभरातून येणाऱ्या भक्त भाविकांप्रमाणेच पर्यटक तपोवनात देखील येत असतात.यामुळे पुर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अँड राहुल ढिकले यांनी तपोवनातील रामसृष्टी मध्ये प्रभु श्रीरामचंद्रांचे शिल्प उभारण्याची संकल्पना मांडली. त्यासाठी 11 ऑक्टोंबर 2022 मध्ये राज्याच्या पर्यटन मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर तपोवनातील रामसृष्टी उद्यानात जागा उपलब्ध करण्याच्या सुचना दिल्या. जागेची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर 71 फुटी शिल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. 


रामसृष्टी मध्ये प्रभू रामचंद्रांचे शिल्प उभारण्याबरोबरचं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कारंजा व विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुशंगाने पर्यटन विभागाने प्रस्तावाला मंजुरी देताना पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 10 फेब्रुवारी 2024 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला होता.