अंबरनाथमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
काल रात्री झालेल्या हल्ल्यावर रामदास आठवले यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली.
अंबरनाथ : अंबरनाथ मध्ये झालेल्या मारहाणीनंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या संविधान या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलीये. शनिवारी रात्री अंबरनाथ येथील विमको नाका परिसरात रिपाईकडून संविधान गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रविण गोसावी या तरुणाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रविण गोसावीला मारहण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर अंबरनाथ व उल्हासनगर परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या प्रकरणावर रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
सुरक्षेत वाढ
आरोपी प्रविण गोसावी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलीस इन्स्पेक्ट नरेंद्र पाटील यांनी सांगितले. पण त्याने असे का केले ? याबाबत हे अजून स्पष्ट झाले नाही.
ज्या ठिकाणी ही घटना घडली तो आरपीआयचा गड मानला जातो. त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
'लोक दु: स्वास करतात'
काल रात्री झालेल्या हल्ल्यावर रामदास आठवले यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. 'माझी लोकप्रियता वाढत असून त्यामुळेच काही लोक माझा दु:स्वास करत आहेत. त्यामुळेच या लोकांनी माझ्यावर हल्ला केला असावा' असं यावेळी रामदास आठवलेंनी माध्यमांना सांगितलं.
कार्यकर्ते संतप्त
या घटनेनंतर आरपीआय कार्यकर्त्यांचा राग अनावर झालेला पाहायला मिळतोय. शनिवारी रात्रीच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आठवले यांच्या घराजवळ गोळा झाले.
हा पुर्वनियोजीत कट असून याच्या मास्टरमाईंडला पकडण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
या मारहणीचा निषेध म्हणून रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या (आरपीआय) कार्यकर्त्यांनी आज (रविवार) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
काय घडली घटना ?
रामदास आठवले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रामदास आठवले यांनी भाषणही केले.
यानंतर ते स्टेजवरून उतरून गाडीकडे चालत जात असताना प्रविण गोसावी या तरुणाने त्यांच्या कानशिलात लगावली.
तेव्हा आजुबाजूच्या कार्यकर्त्यांना लगेचच या व्यक्तीला पकडून चोप दिला.
या प्रकारानंतर रामदास आठवले मुंबईकडे रवाना झाले आहेत. पोलिसांनी प्रविण गोसावीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
तो आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे. प्राथमिक उपचारानंतर प्रवीण गोसावी याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.