सांगली : नुकताच झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला. पण लोकसभा निवडणुकीत भाजपच सत्तेत येईल असा भाजप नेत्यांना विश्वास आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे. 5 राज्यातील निकाल भाजप विरोधात लागला असला तरी लोकसभा निवडणुकीच्या हवा बदलेल आणि नरेंद्र मोदीच पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. तसेच प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे पण रिझर्व्ह बँक सरकारला पैसे देत नसल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी इस्लामपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 5 राज्यातील निकालांच परिणाम आगामी निवडणुकांवर होणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं. देशातील सर्व दलित हे आरपीआयच्या बाजूने आहेत आणि आरपीआय हा भाजप सोबतच असणार आहे. लोकसभा निवडणुकीत आरपीआयसाठी आणखी दोन जागा मागणार असल्याचंद देखील यावेळी रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.


आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवेसनेने एकत्र आले पाहिजे. माझी भूमिका नेहमीच मध्यस्थिची असते. सर्व घटक पक्षांना एकत्र आणण्यासाठी मी मध्यस्थी करणार असल्याचं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणांपैकी काही घोषणा पूर्ण झाल्या आहेत. नागरिकांच्या खात्यावर १५ लाख जमा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पण  रिझर्व्ह बँक आम्हाला पैसे देत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत पण सरकार याबाबत रिझर्व्ह बँकेशी बोलत आहे. लवकरच पैसे जमा होतील असा विश्वासही आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.