पुणे : छगन भुजबळ यांना प्लान करुन गोवण्यात आलं. अंजली दमानियांनी त्यांना गोवलं, असा गंभीर आरोप आरपीआयचे अध्यक्ष आणि सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. भुजबळ तुरुंगातून बाहेर आले ही चांगली गोष्ट आहे. भुजबळ ओबीसी समाजाचे लढवय्ये नेते आहेत. त्यांनी बांधलेलं महाराष्ट्र सदन अतिशय चांगलं आहे. खोटे-नाटे आरोप करून अंजली दमानिया यांनी त्यांना गोवल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला.


'संभाजी भिडेंची चौकशी करा'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे गुरुजींची सखोल चौकशी गरजेची आहे. त्यात ते दोषी नसल्याचं आढळल्यास त्यांना अटक करण्याची गरज नाही, असं रामदास आठवले यांनी म्हंटलय.


आठवलेंनी घेतली सकट कुटुंबाची भेट


कोरेगाव भीमा हिंसाचाराची साक्षीदार असलेल्या पूजा सकटचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. या  पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी पूजा सकट यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पूजाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केलीय.


पूजा सकट यांच्या कुटुंबियांना  रिपब्लिकन पक्षातर्फे नुकतीच 1 लाख रुपयांची सांत्वनपर मदत करण्यात आली आहे. पूजा सकट कुटुंबियांना शासनातर्फे अधिक मदत मिळवुन देण्यासाठी  रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली आहे.


सरकार भाजप किंवा काँगेस कुणाचेही असो दलितांवर अत्याचार आधीपासून होत आले आहेत. मी माझ्या मंत्रिपदाचा उपयोग दलितांचे प्रश्न सोडवण्याकरता करत आहे, त्यामुळे मी सरकार मधून बाहेर पडण्याचा संबंध नाही, अशी स्पष्ट भूमिका आठवलेंनी घेतलीय.


'आम्ही भाजपच्या पाठीशी'


पालघरमध्ये शिवसेनेनं भाजपचा उमेदवार पळवल्यानं भाजपनं काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना उमेदवारी दिलीय. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष हुशार आहेत, त्यामुळे हे घडलय. असं असलं तरी पालघरमध्ये आम्ही भाजपच्या पाठीशी आहोत आणि त्याठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे.