बीड : पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एक स्फोटक वक्तव्य केलंय. शिवसैनिक लवकर पेटत नाही आणि पेटला तर लवकर विझत नाही तसंच एकदा पेटला की कुणाला गाडल्याशिवाय राहत नाही आणि याचा अनुभव शाह साहेबांना भविष्यात येईल, असं वक्तव्य रामदास कदमांनी बीडमध्ये केलंय. शिवसेनेची पाळमुळं खोलवर रुजलेली आहेत हे अमित शहांना माहीत नाही, असंही कदम यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातून, सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि भाजपमधलं शीतयुद्ध आता निवडणुकीच्या निमित्तानं उघडपणे समोर येणार असंच दिसतंय. युतीत कितीही तणाव निर्माण झाला, चर्चा झाल्या तरी युतीचा निर्णय शेवटी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे हेच घेतील, असंही त्यांनी म्हटलंय. 


आज राज्यात राजकीय झंझावात पहायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात जाहीर सभा घेणार आहेत तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची सुरुवात बीडमधून होतेय. या दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख बीड आणि जालना जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे सुरुवातीलाच बीड जिल्ह्यात जाणार असून नंतर ते जालना जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. बीड जिल्ह्यात जनावरांसाठी पशुखाद्याचं वाटप त्यांच्या हस्ते होणार असून जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे देखील पशुखाद्याचं वाटप केलं जाणार आहे. बीड आणि जालना या दोन्हीही जिल्ह्यात उद्धव ठाकरे सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे भाजपाच्या टीकेवर काय बोलतात याकडे लक्ष लागलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय.