मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून शिवसेना-भाजपात मोठ्या प्रमाणात भरती सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. यानंतर राष्ट्रवादी नेते रामराजे निंबाळकर हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चानंतर रामराजे यांनी संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. मी आज तरी राष्ट्रवादीतच आहे, उद्याचं उद्या पाहू असे विधान त्यांनी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामराजे आणि उदयनराजे यांचा वाद नवा नाही. काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांनी नीरा देवघर पाणी प्रश्नावरून रामराजे नाईक निंबाळकर यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. भगीरथ म्हणून घेणाऱ्यांनी लाल बत्तीचा वापर केला आणि लोकांची खिल्ली उडवण्यापलीकडे काही केले नाही, त्यांना देवसुद्धा माफ करणार नाही, असे उदयनराजेंनी म्हटले होते. या टीकेला प्रत्युत्तर देताना रामराजे निंबाळकर यांनी म्हटले की, उदयनराजेंनी मला स्वयंघोषित भगीरथ म्हटले. मला वाटतं की, ते स्वयंघोषित छत्रपती आहे. 



उदयनराजेंनी त्याठिकाणी आपल्या लँडक्रुझर गाडीतून जावे आणि डाव्या दिशेने वळून आंदरूडपर्यंत प्रवास करावा. त्यावेळी उदयनराजेंना समजेल की, ज्या भागाला नीरा- देवघर योजनेतील पाणी कधीही मिळू शकत नव्हते अशा भागापर्यंत १०-१५ बोगदे पाडून मी कृष्णेचे पाणी पोहोचवले होते. 


उदयनराजेंना आवरा, अन्यथा पक्षातून बाहेर पडू; रामराजे निंबाळकरांचा इशाराही रामराजेंनी पक्षश्रेष्ठींना दिला होता. 


आता उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर रामराजेंची अडचण दूर झाल्याची चर्चा आहे. पण सध्यातरी शरद पवारांची साथ सोडावंस वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. रामराजे यांनी कार्यकर्ता मेळावा बोलावला असून त्यानंतर कार्यकर्ते काय ठरवतील यावरून निर्णय घेऊ असेही म्हटले आहे. त्यामुळे या चर्चांना स्वल्पविरामच आहे.