वडिलांनी कर्मचा-याला केलेल्या मारहाणीवर बोलले गृहराज्यमंत्री रणजित पाटील
वडिलांनी एका महाविद्यालयीन कर्मचा-याला केलेल्या मारहाण प्रकरणावर अखेर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मौन सोडलं आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याचं रणजित पाटील यांनी अकोल्यात स्पष्ट केलं आहे. अकोला जिल्ह्यामधल्या मुर्तिजापूर तालुक्यातल्या घुंगशी इथल्या शाळेत, रणजित पाटील यांचे वडील आणि माजी आमदार विठ्ठल पाटील यांनी एका कर्मचा-याला मारहाण केली होती.
मुंबई : वडिलांनी एका महाविद्यालयीन कर्मचा-याला केलेल्या मारहाण प्रकरणावर अखेर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मौन सोडलं आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याचं रणजित पाटील यांनी अकोल्यात स्पष्ट केलं आहे. अकोला जिल्ह्यामधल्या मुर्तिजापूर तालुक्यातल्या घुंगशी इथल्या शाळेत, रणजित पाटील यांचे वडील आणि माजी आमदार विठ्ठल पाटील यांनी एका कर्मचा-याला मारहाण केली होती.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून आपल्या आणि संजय देशमुखांच्या संस्थेत वाद असल्याचं रणजित पाटील यांनी मान्य केलंय. दरम्यान, कायदा आपलं काम करणार असल्याचं रणजित पाटील म्हणाले. विठ्ठल पाटील यांनी शनिवारी घुंगशीमधल्या भाऊसाहेब देशमुख विद्यालयात जाऊन, कुठलाही अधिकार नसताना तपासणीचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी तिथल्या कर्मचा-याला अश्लील शिविगाळ करत मारहाण केली.
घुंगशी गावात विठ्ठल पाटील आणि संजय देशमुख या दोघांचीही स्वतंत्र विद्यालयं आहेत. मात्र, शाळेतली पटसंख्या कमी होण्यावरुन दोन्ही संस्थांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. या प्रकरणी संजय आठवले यांनी मुर्तिजापूर पोलीस ठाण्यात माजी आमदार विठ्ठल पाटिल यांच्याविरुद्द तक्रार दाखल केली आहे.